ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत न्यू साऊथ वेल्स आणि तस्मानिया यांच्यातल्या सामन्यात स्टार्कचा पारा चढलेला पाहायला मिळाला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावण्याची संधी कर्णधारामुळे निसटली आणि त्या रागात स्टार्कनं बॅट फेकली.
न्यू साऊथ वेल्सकडून सीन अॅबॉट याच्यासह तीघांनी शतकी खेळी केली आणि स्टार्कहा चौथा फलंदाज ठरला असता. पण, न्यू साऊथ वेल्सचा कर्णधार पीटर नेव्हिल यानं डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. सीन अॅबॉटनं शतक पूर्ण केल्यानंतर नेव्हिलनं डाव घोषित केला. तेव्हा स्टार्क ८६ धावांवर खेळत होता. कर्णधाराचा हा निर्णय स्टार्कला काही आवडला नाही आणि ड्रेसिंग रुममध्ये येताच त्यानं रागात बॅट फेकली.
ऑस्ट्रेलियाच्या या स्टार गोलंदाजानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०१३साली भारताविरुद्ध ९९ धावांची ( वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या) खेळी केली होती. स्टार्कनं आतापर्यंत ऑस्ट्रेलिया व न्यू साऊथ वेल्ससाठी १०३ रेड बॉल सामने खेळले, परंतु त्याला एकदाही शतक झळकावता आले नाही. त्यामुळेच त्याचा पारा चढलेला पाहायला मिळाला.
दरम्यान, नेव्हिलनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात घेतलेला हा निर्णय ट्रेंट कोपलँडनं योग्य ठरवला. १३ षटकांत कोपलँडनं तस्मानियाच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. दिवसअखेर तस्मानियाची अवस्था २ बाद २६ अशी झाली होती आणि ते अजूनही ३२१ धावांनी पिछाडीवर आहेत. न्यू साऊथ वेल्सनं त्यांचा दुसरा डाव ६ बाद ५२२ धावांवर घोषित केला. निक लार्किन, मोईसेस हेन्रीक्स आणि सीन अॅबॉट यांनी शतकी खेळी केली. न्यू साऊथचा पहिला डाव ६४ धावांवर गडगडला होता आणि प्रत्युत्तरात तस्मानियानं २३९ धावा केल्या होत्या.