सिडनी - ऑस्ट्रेलियाचा भेदक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना एकाच सामन्यात दोनवेळी हॅट्ट्रीक घेण्याची करामत करुन दाखवली. 1979 नंतर एकाच सामन्यात दोनवेळा हॅट्ट्रीक घेणारा स्टार्क पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी आर.ओ जेन कीन्स, अमीन लाखानी, टी.जे.मॅथ्यूज, सी.डब्लू. एल. पारकर, जे.एस.राव, ए. शॉ आणि ए.ई. ट्रॉट यांनी एकाच सामन्यात दोनवेळा हॅट्ट्रीक घेतली होती. त्याच्या या कामगिरीने हर्टस्विले येथील या प्रथम श्रेणी सामान्यात न्यू साऊथ वेल्सला वेस्टर्न ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून दिला.
राव आणि ट्रॉट यांनी तर एकाच डावात दोनवेळा हॅट्ट्रीक घेतली होती. शेफील्ड शिल्ड स्पर्धेतील स्टार्कची ही कामगिरी इंग्लंडसाठी धोक्याची घंटा आहे. या महिन्यापासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अॅशेस मालिका सुरु होत आहे. पहिल्या डावात स्टार्कने जेसन बेहरेनडॉर्फ , डेव्हिड मूडी आणि सायमन मॅकीन यांना सलग तीन चेंडूंवर बाद करुन पश्चिम ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला.
स्टार्कने जेसन आणि मॅकीन यांना यार्कर चेंडूवर बाद केले आणि मूडीला पायचीत पकडले. स्टार्कने पहिल्या डावात चार आणि जोश हेझलवूडने तीन विकेट घेतल्या. दुस-या डावात पश्चिम ऑस्ट्रेलियाला 395 धावांचे लक्ष्य दिले होते. दुस-या डावात स्टार्कने जेसन, मूडी आणि वेल्सला बाद केले. दुस-या डावात 15 व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर जेसन बेहरेनडॉर्फ व डेव्हिड मुडी यांना बाद केले आणि 16 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जॉन वेल्स याला बाद केले. स्टार्क आणि हेझलवूडच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर न्यू साऊथ वेल्सने हा सामना 171 धावांनी जिंकला.
प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये एकाच सामन्यात एका गोलंदाजाने दोन हॅट्ट्रीक करण्याची ही आठवी वेळ आसून 39 वर्षानंतर पहिल्यांदा असे घडले आहे. ऑस्ट्रेलियन मैदानावर प्रथमच असा पराक्रम घडला आहे. स्टार्कच्या आधी ऑस्ट्रेलियातर्फे केवळ टी. जे. मॅथ्थ्युज याने एका सामन्यात दोन हॅट्ट्रीक केल्या आहेत. त्याने 1912 च्या तिरंगी कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुध्द हा पराक्रम केला होता.