लखनौ : मागच्या दोन दशकांहून अधिक काळ भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली असून, जागतिक महिला क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या शेर्लोट एडवर्ड्सनंतर ती दुसरी खेळाडू आहे. ३०९ सामन्यांत १० हजार २७३ धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली; पण मिताली अजूनही खेळत असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमानही मिताली लवकरच पटकावू शकेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३८ वर्षांच्या मितालीने ३५ वी धाव घेताच हा विक्रम केला. तिच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००१ धावा झाल्या आहेत. मितालीचा हा ३११ वा सामना आहे. १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत ३१० सामने खेळले. त्यात १० कसोटी, २११ एकदिवसीय आणि ८९ टी २० सामन्यांचा समावेश आहे. १९९९ मध्ये आयर्लंडविरुद्ध मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे.
दिग्गजांनी केले अभिनंदन
बीसीसीआयने ट्वीट करीत मितालीला ‘शानदार खेळाडू’ संबोधले. सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे सचिव जय शहा, व्हीव्हीएस लक्ष्मण, यांनी मितालीची कामगिरी युवांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून तिला ‘क्रिकेटची महान दूत’ म्हटले.
‘रेकॉर्ड क्वीन’ मिताली!
मितालीच्या नावावर दहा कसोटींत ६३३, २१२ वन डेत ६९७४ आणि ८९ टी-२० सामन्यांत २३६४ धावा आहेत. कारकीर्दीत तिची ७५ अर्धशतके आणि आठ शतके आहेत. त्यातील ५४ अर्धशतके आणि सात शतके तिने वनडेत पूर्ण केली. कसोटीत मितालीने एकमेव शतक (२१४ धावा) इंग्लंडविरुद्ध २००२ मध्ये टॉंटन येथे झळकाविले होते. मिताली २०१९ ला टी-२० प्रकारातून निवृत्त झाली. यामध्ये तिची १७ अर्धशतके असून, नाबाद ९७ या सर्वाेच्च खेळीचा समावेश आहे. मिताली सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेली महिला क्रिकेटपटू आहे.
Web Title: Mithali Raj दुसरी 10,000, second player in the world after Charlotte Edwards
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.