हैदराबाद, दि. 1 - भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला विश्वचषकात केलेल्या दमदार कामगिरी बद्दल बीएमडब्ल्यू कार गिफ्ट म्हणून मिळाली आहे. मिताली राजला हैदराबादमध्ये ही आलिशान कार भेट देण्यात आली आहे. ज्युनिअर क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीला बीएमडब्ल्यू कार देऊन सन्मान केला.चांमुडेश्वरनाथ यांनी आंध्रप्रदेशच्या रणजी संघाचं नेतृत्व केलं आहे. चामुंडेश्वरनाथ यांनी याआधीही काही खेळाडूंना कार भेट दिल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने आणि विशेषत: मिताली राजने वर्ल्ड कपमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी चामुंडेश्वरनाथ बीएमडब्ल्यू कार गिफ्ट दिली. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत हातातोंडाशी आलेला विश्वचषक विजय भारतीय संघाच्या हातून निसटला. अंतिम लढतीत भारताला केवळ 9 धावांनी पराभूत व्हावे लागल्याने विश्वविजयाचं स्वप्न भंगलं. तरी भारतीय महिला क्रिकेटला या स्पर्धेत एक विशिष्ट उंची प्राप्त करुन देण्यात मितालीला यश आले. त्यामुळेच पराभवानंतरही महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव झाला.'मितालीने भारतीय क्रिकेटवर आपली एक छाप सोडली असून सर्वांना प्रभावित केलं आहे. ज्याप्रकारे तिने संघाचं नेतृत्व केलं ते खूपच उल्लेखनीय होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून मिताली भारतीय महिला क्रिकेट संघाची मुख्य खेळाडू राहिली आहे', असं चामुंडेश्वरनाथ बोलले आहेत.'आपल्या मुलींनी खूप चांगली खेळी केली. महिला क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांच लक्ष वेधलं असून महिलांच्या खेळांची नोंद घेण्यास भाग पाडलं आहे. यामुळे अनेक मुलींमध्ये क्रिकेटची आवड आणि ओढ निर्माण होईल', असं चामुंडेश्वरनाथ यांनी सांगितलं आहे.चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीला कार गिफ्ट देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2007 साली चामुंडेश्वरनाथ यांनीच तिला शेवरलेटची कार गिफ्ट दिली होती. आणि आता पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त कामगिरीसाठी त्यांनी आलिशान कार गिफ्ट करण्याचं ठरवलं आहे. चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीशिवाय ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांनाही कार गिफ्ट दिल्या होत्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या हस्ते हैदराबादमधील एका कार्यक्रमात पी व्ही सिंधू, दिपा कर्माकर, साक्षी मलिक आणि प्रशिक्षक गोपीचंद यांना या कार सोपवण्यात आल्या होत्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मिताली राजला मिळालं हे खास गिफ्ट
मिताली राजला मिळालं हे खास गिफ्ट
भारतीय महिला क्रिकेटला विश्वचषक स्पर्धेत एक विशिष्ट उंची प्राप्त करुन देण्यात मितालीला यश आले. त्यामुळेच पराभवानंतरही महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव झाला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 8:26 PM