भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज ( India captain Mithali Raj) हिनं नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली. तिनं तीनही सामन्यांत अर्धशतकी खेळी केली आणि याच कामगिरीमुळे तिनं आयसीसीच्या जागतिक वन डे क्रमवारीत फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. २२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत मिताली आठव्यांदा अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. ( India captain Mithali Raj grab the No.1 position in the ICC Women’s ODI Player Rankings for the eighth time in her stellar 22-year international career)
३८ वर्षीय मितालीनं पहिल्या व दुसऱ्या वन डे सामन्यात अनुक्रमे ७२ व ५९ धावांची खेळी केली, परंतु संघाला विजय मिळवता आला नाही. तिसऱ्या सामन्यात मितालीच्याच नाबाद ७५ धावांच्या जोरावर टीम इंडियानं विजय मिळवला. पण, इंग्लंडनं ही मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेपूर्वी मिताली राज आठव्या क्रमांकावर होती, परंतु सर्वाधिक २०६ धावा करताना तिनं थेट अव्वल स्थानी झेप घेतली. फेब्रुवारी २०१८नंतर ती प्रथमच अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. एप्रिल २००५मध्ये ती सर्वात प्रथम अव्वल स्थानावर विराजमान झाली होती, तेव्हा तिनं वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध नाबाद ९१ धावा चोपल्या होत्या. १६ वर्षांत मिताली अनेकदा या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
इंग्लंडच्या जॅनेट्टे ब्रिटीनीनं १९८४साली सर्वात आधी अव्वल स्थान पटकावले अन् १९९५नंतर तिला पुन्हा हा पराक्रम करता आला नाही, न्यूझीलंडची डेबी हॉक्लीनं १०वर्ष अव्वल स्थान पटकावले, १९८७ ते १९९७ या कालावधीत तिनं हा पराक्रम केला. दुसरीकडे भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्मा ( ४४ व १९) ७१व्या क्रमांकावरून ४९व्या स्थानी आली आहे. स्मृती मानधना ९व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये झुलन गोस्वामी व पूनम यादव अनुक्रमे ५ व ९व्या क्रमांकावर आहे. ट्वेंटी-20त अष्टपैलू खेळाडूंमध्ये दीप्ती शर्माची पाचव्या स्थानी घसरण झाली.