हैदराबाद : ऑसीविरुद्ध मोहाली व दिल्लीतील अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांचे स्थान बदलण्याचा कुठलाही विचार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले.भारत-पाक यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकदिवसीय सामने उत्तरेतून दक्षिणेत हलविण्याच्या हालचाली असल्याचे वृत्त काही माध्यामांनी दिले होते.
मोहालीत चौथा सामना १० मार्च रोजी व दिल्लीत पाचवा सामना १३ मार्च रोजी होईल. सामन्यांची स्थळे हलविल्यास सौराष्ट्रने एका सामन्याचे यजमानपद भूषविण्याची तयारी दाखविली होती. काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना म्हणाले, ‘मोहाली व दिल्लीतील सामने निर्धारित वेळेनुसार होतील. सौराष्ट्रने इच्छा व्यक्त केली ही चांगली बाब आहे, पण सध्यातरी याची गरज नाही.’
धोनीला दुखापत...शुक्रवारी भारताचा अनुभवी महेंद्रसिंग धोनीने सहायक प्रशिक्षक रघुवेंद्र यांच्यासह सराव केला. यावेळी एक चेंडू धोनीच्या हाताला लागला. त्यानंतर त्याने विश्रांती घेतली. याविषयी संघ व्यवस्थापनाने काहीही सांगितले नाही. जर धोनी शनिवारी खेळला नाही, तर रिषभ पंत याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी येऊ शकते. (वृत्तसंस्था)