Babar Azam, PAK vs ENG: T20 World Cup 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. फायनलमध्ये इंग्लंडच्या संघाने मोक्याच्या क्षणी पाकिस्तानच्या हातून विजयश्री खेचून आणली. १३८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने ४९ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली आणि संघाला दुसरे टी२० विश्वविजेतेपद मिळवून दिले. २०१० नंतर इंग्लंड दुसऱ्यांदा टी२० चॅम्पियन झाला. पण पाकिस्तानच्या पराभवानंतर आता बाबर आझमच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानचा संघ फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यातच फलंदाजीत ढेपाळला. मोहम्मह रिझवान पहिल्या षटकांत बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांना त्या धक्क्यातून सावरणे शक्यच झाले नाही. त्यामुळेच पाकिस्तानच्या संघाला २० षटकात केवळ ८ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर इंग्लंडचा पहिला गडी पहिल्या षटकात बाद होऊन देखील पाकिस्तानला त्याचा फायदा घेता आला नाही. बेन स्टोक्सने शांत आणि संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिलाच.
पाकिस्तानच्या पराभवानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने बाबर आझमच्या कप्तानीवरच प्रश्न उपस्थित केले. मोहम्मद नवाझसारख्या मॅचविनर गोलंदाजाला बॉलिंग न देण्यामागे काय विचार होता, असा सवाल त्याने केला. सेमीफायनलमध्ये नवाझने २ षटके टाकली होती आणि शतकवीर ग्लेन फिलिप्सला माघारी धाडले होते. पण त्याला संधी देण्यात आली नाही. यावरून आमिर चांगलाच संतापला.
"संपूर्ण स्पर्धेत आपल्या संघाएवढी चांगली गोलंदाजी कोणाचीच नव्हती हे सिद्ध झाले. कोणत्याही संघाच्या फलंदाजांना आपल्या बॉलर्सवर हल्ला चढवता आला नव्हता. पण मला नवाझबद्दल एक समजलं नाही. पहिल्या सामन्यानंतर बाबर ड्रेसिंग रूममध्ये नवाझला सांगत होता की तू मॅचविनर आहेस. तुला काळजी करण्याची गरज नाही. पण नंतर तो गोलंदाज म्हणून खेळला की फलंदाज म्हणून खेळला हे समजणं कठीणच झालं. यावरून एकच गोष्ट दिसून येते की कर्णधाराचा त्याच्यावर विश्वास नव्हता. तुम्ही जर एखादी गोष्ट बोलत असाल तर तुम्ही त्याप्रमाणे वागायला हवे. PSL सारख्या स्पर्धेत नवाझने पहिले षटकही टाकले आहे आणि स्वत:च्या हिमतीवर सामनेही जिंकवले आहेत. त्याने फायनलमध्येही नक्कीच काहीतरी कमाल करून दाखवली असती. पण मला बाबरचा निर्णयच समजला नाही," अशा शब्दांत आमिरने बाबरवर टीका केली.