मुंबई : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हा आता आपली नवी इनिंग्स सुरु करत आहे. कारण आज झालेल्या हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीसाठी अझरुद्दीन अध्यक्षपदासाठी उभा होता. या निवडणूकीमध्ये अझरुद्दीनने सर्वाधिक 147 मते मिळवली असून आता तो हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. अझरुद्दीनने भारतासाठी 99 कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
अझरुद्दीन हा मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यामुळे अझरुद्दीनवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण 2012 साली अझरुद्दीनवरील बंदी उठवण्यात आली होती. 2009 साली अझरुद्दीनने राजकारणामध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसकडून अझरुद्दीन खासदारकीसाठी उभा राहीला होता आणि जिंकूनही आला होता. त्यानंतर त्याने लढवलेली ही दुसरी निवडणूक आहे.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी एकूण 12 अर्ज दाखल झाले होते. पण निवडणूक जवळ येताच 9 व्यक्तींनी आपले अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे ही अध्यक्षपदाची निवडणूक तीन जणांमध्ये लढवली गेली होती. अझरुद्दीनने सर्वाधिक 147 मते मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यामुळे आता क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आपल्याला अझरुद्दीन विराजमान होणार आहे.