इमर्जिंग आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या भारताला ट्रॉफीपासून दूर राहावे लागले. पाकिस्तानी संघाने विजय मिळवून यश धुलच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा दारूण पराभव केला. खरं तर इमर्जिंग आशिया चषकात केवळ असेच खेळाडू खेळवले जातात, ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्त क्रिकेट खेळले नाही. पण, भारत वगळता इतर संघांमध्ये अनुभवी खेळाडू असल्याचे दिसले. भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने रडीचा डाव खेळल्याची चर्चा रंगली. याबद्दल बोलताना पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद हारिसने भारतीय संघावर सडकून टीका केली.
भारतीय संघात युवा खेळाडू असल्याचा दाखला देत भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली होती. तर, पाकिस्तानी संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंची मोठी फळी होती. यामध्ये कर्णधार मोहम्मद हारिस, मोहम्मद वसिम, शाहनवाज दहानी आणि सैय अयुब या खेळाडूंचा समावेश होता. पाकिस्तानी संघात अनुभवी खेळाडू तर दुसरीकडे टीम इंडिया २० वर्षीय यश धुलच्या नेतृत्वात मैदानात होती. अंतिम सामना जिंकून पाकिस्तानने किंताब उंचावला.
हारिसचे प्रत्युत्तर पाकिस्तानी संघावर होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना हारिसने भारतावर टीका केली. तसेच पाकिस्तानी संघात अनुभवी खेळाडू असल्यामुळे फायदा झाल्याचा दावा त्याने फेटाळून लावला. त्याने सांगितले की, पाकिस्तान संघातील आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने ट्वेंटी-२० मध्ये मर्यादित अनुभव आहे. हारिसने आपल्या संघाचा बचाव करताना पॉडकास्टमध्ये सांगितले, "लहान खेळाडू पाठवा असे आम्ही बीसीसीआयला सांगितले नव्हते."
"लोक म्हणतात की पाकिस्तानने अनेक अनुभवी खेळाडू असलेला संघ पाठवला आहे. पण, आम्ही लहान मुलांना स्पर्धेत पाठवण्यास सांगितले नव्हते. ते म्हणतात की आमच्या संघात आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले खेळाडू होते. आम्ही किती आंतरराष्ट्रीय सामने खेळलो? सैमने ५ सामने खेळले आहेत. मी ६ खेळलो आहे. पण, भारतीय खेळाडूंनी २६० आयपीएल सामने खेळले आहेत", असे हारिसने अधिक सांगितले.