वन डे विश्वचषकात पाकिस्तानी संघाने नेदलॅंड्सचा पराभव करून विजयी सलामी दिली. पण, नवख्या नेदरलॅंड्सविरूद्ध पाकिस्तानला चांगलाच संघर्ष करावा लागला. ८१ धावांनी बाबर आझमच्या संघाला विजय मिळवता आला असला तरी शेजाऱ्यांच्या गोलंदाजीने चाहत्यांना निराश केले. पाकिस्तानचा पुढचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. आगामी सामन्यापूर्वी पीसीबी डिजिटलशी बोलताना पाक खेळाडू मोहम्मद नवाजने विविध बाबींवर प्रकाश टाकला. तसेच भारतातील बाउंन्ड्री लहान असल्यामुळे गोलंदाजांना कठीण जाते, असे त्याने यावेळी सांगितले.
नवाज म्हणाला की, मोठ्या स्पर्धेत विजयाने सुरूवात करणे चांगले असते. आम्ही भारतात दोन सराव सामने खेळले आहेत. सहकारी खेळाडूंनी एकमेकांना चांगली साथ दिली. नेदरलॅंड्सविरूद्ध मिळवलेला विजय आणि हा विजयरथ असाच कायम राहील अशी आशा आहे. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी मागील सामन्यात चांगली भागीदारी नोंदवली. मी आणि शादाब खानने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. ४५व्या आणि ४६व्या षटकापर्यंत आम्ही खेळपट्टीवर टिकून होतो. पण, दुर्दैवाने आम्ही आणखी चांगले करू शकलो नाही. पण संघासाठी एक चांगली धावसंख्या उभारण्यात यश आले.
पाकिस्तानी संघाने सांघिक खेळी करत नेदरलॅंड्सविरूद्ध ४९ षटकांत सर्वबाद २८६ धावा केल्या. मोहम्मद रिझवान (६८) आणि सौद शकील (६८) यांच्या खेळीमुळे शेजाऱ्यांचा जम बसला. मात्र, नेदरलॅंड्सच्या बेस डी लीडने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाजूने प्रभावित केले. त्याने चार बळी घेऊन पाकिस्तानला २८६ धावांवर रोखण्यात मोलाची भूमिका पार पाडली. पाकिस्तानने दिलेल्या २८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४१ षटकांत केवळ २०५ धावांवर नेदरलॅंड्सचा संपूर्ण संघ तंबूत परतला. ६८ चेंडूत ६७ धावांची खेळी करून बेस डी लीडेने कडवी झुंज दिली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले.
मोहम्मद नवाजचं रोखठोक मत
मोहम्मद नवाजने आणखी सांगितले की, भारतातील बहुतांश मैदानावरील खेळपट्टी फलंदाजांना अधिक मदत करते. येथील बाउन्ड्री लहान असल्यामुळे ते गोलंदाजांना कठीण जाते. पण, आम्ही परिस्थितीशी दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे साहजिकच माझा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
Web Title: mohammad nawaz said, Small boundaries make it tough for bowlers in India ahead of pak vs sl clash in icc odi world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.