Mohammad Rizwan Bold Statement After Replacing Babar as Named Pakistan Captain : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत असल्याचे दिसून आहे. बाबर आझमची बादशाहत असताना वझीरच्या रुपात दिसलेला मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan ) आता व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. कॅप्टन्सीची माळ गळ्यात पडल्यावर रिझवान याने मोठं वक्तव्य केले आहे. जे कदाचित त्याचा जीवलग मित्र बाबर आझमच्या जिवाला लागेल, असे आहे.
कॅप्टन्सीबद्दल काय म्हणाला आहे रिझवान?
पाकिस्तान संघाचा कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर मोहम्मद रिझवान म्हणाला आहे की, मी किंग नाही तर एक कॅप्टन होण्याचा प्रयत्न करेन. जर कॅप्टन्सीत मी राजाप्रमाणे वागायला लागलो तर सगळ कोलमडून पडेल. त्यामुळे मी नेता होऊन संघातीलसदस्यांची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा पॅटर्न लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी बळ देणारा ठरेल, अशा आशयाच्या वक्तव्य रिझवान याने केले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रिझवानच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार बाबर आझम
बाबर आझम याला पाकिस्तानचा किंग अशी उपमा दिली जायची. त्यामुळेच रिझवानच्या कॅप्टन्सीनंतरच्या वक्तव्यात आलेला किंग शब्द पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद अन् राजेशाही थाटातील नेतृत्व असं काहीसं चित्र निर्माण करणारा आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आउट करण्यात आलेल्या बाबर आझमसह शाहिन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी संघात स्थान मिळाले आहे. पण झिम्बाब्वे विरुद्धच्या संघात त्यांना संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत बाबर आझम आणि रिझवान यांच्यातील सीन कसा असेल ते पाहण्याजोगे असेल.
या एका गोष्टीत मात्र बाबरला मिळाला मोठा दिलासा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं वार्षिक कराराची यादीही जाहीर केली आहे. यात बाबर आझमला मोठा दिलासा मिळाला आहे. मोहम्मद रिझवानसोबत तो अ श्रेणीतील खेळाडूंच्या यादीत आहे. दुसरीकडे शाहिन शाह आफ्रिदीला 'अ' श्रेणीतून 'ब' श्रेणीत टाकण्यात आले आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकून देणारा पाकिस्तानी कसोटी संघाचा कॅप्टन शान मसूद हा 'ब' श्रेणीत आहे.
बाबरचं समर्थन करणाऱ्या फखर झमान हा करारातून 'आउट'
एका बाजूला धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमला वार्षिक करारात दिलासा मिळाला असताना दुसऱ्या बाजूला त्याची पाठराखण करणाऱ्या फखर झमान याला मात्र वार्षिक करारातून आउट करण्यात आले आहे. आठ वर्षात पहिल्यांदा करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून त्याचं नाव गायब झालं आहे.