नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) पाकिस्तानचा संघ शानदार लयनुसार खेळत आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) 3 सामन्यात 2 अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली आहे. रिझवानने आशिया चषकात अनुक्रमे 78 नाबाद आणि 71 धावा केल्या आहेत. 3 सामन्यांमध्ये एकूण 192 धावा करून मोहम्मद रिझवानने पाकिस्तानच्या फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. अशातच आयसीसीने रिझवानला एक मोठे गिफ्ट दिले आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत रिझवानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) मागे टाकून पहिले स्थान पटकावले आहे.
दरम्यान, टी-20 क्रमवारीतील अव्वल स्थान गाठल्यानंतर मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला राजा म्हणून संबोधले आहे. बाबर आजही माझ्यासाठी राजा असल्याचे रिझवानने म्हटले आहे. "हे फक्त अल्लाहकडून होते. अल्लाहशिवाय होत नाही. याला बाबर आझमच्या कारकिर्दीतील 1,156 वा दिवस म्हणून मोजा. कर्णधार किंवा आम्ही वेगळे नाही आहोत. राजा हा राजाच राहतो. आपण सर्व एक आहोत. तुम्हा सर्वांची साथ, प्रेम आणि आशीर्दावासाठी धन्यवाद", अशा आशयाचे ट्विट करून रिझवानने बाबर आझमचे कौतुक केले आहे.
भारताच्या 'सूर्या'ची झाली घसरण
आयसीसी टी-20 क्रमवारीत बाबर आझमची दुसऱ्या तर भारताच्या सूर्यकुमार यादवची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमचा नंबर लागला आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात मोहम्मद रिझवान शानदार फॉर्ममध्ये आहे. रिझवानने भारताविरूद्धच्या सामन्यात 71 धावांची खेळी करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. लक्षणीय बाब म्हणजे मोहम्मद रिझवान तिसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे ज्याने आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या संघातील बाबर आझम आणि मिस्बाह उल-हक यांनी ही किमया साधली होती. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम त्याच्या कारकिर्दीत (7 सप्टेंबरपर्यंत) 1,155 दिवस टी-20 फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला आहे.
Web Title: Mohammad Rizwan give big statement about Babar Azam after topped the ICC T20 rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.