Join us  

मोहम्मद रिझवान पाकिस्तानचा नवीन कर्णधार; PCB ने जबाबदारी सोपवताच केलं मोठं विधान

मोहम्मद रिझवान याला बाबर आझम याच्या जागी वन डे आणि ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 6:40 PM

Open in App

पाकिस्तानच्या निवडकर्त्यांनी चार नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रविवारी संघाची घोषणा केली. यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याला बाबर आझम याच्या जागी वन डे आणि ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. सलमान अली आगा याला भविष्यातील सर्व वन डे आणि ट्वेंटी-२० सामन्यांसाठी उपकर्णधार करण्यात आले आहे. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी- २० सामने खेळणार आहे. त्याची सुरुवात चार नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये (वन डे) पहिल्या सामन्याने होणार आहे.

कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोहम्मद रिझवानने विविध बाबींवर प्रकाश टाकला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे रिझवानने सांगितले की, पाकिस्तानी संघाचे नेतृत्व करणे म्हणजे २५ कोटी पाकिस्तानी जनतेचा भार पेलणे होय. माझ्यावर ही जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आतापर्यंत झालेल्या कर्णधारांप्रमाणेच मीदेखील पाकिस्तान क्रिकेटला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेन. खरे सांगायचे तर, मी कधीच मला पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवा अशी इच्छा व्यक्त केली नव्हती. मी इतर कर्णधारांकडून खूप काही शिकत आलो आहे. त्यामुळे माझ्या नेतृत्वात खेळणाऱ्या काही खेळाडूंना कर्णधाराचे गुण शिकवण्यावर माझा भर असेल. 

कर्णधार म्हणून रिझवानचा मेलबर्न येथे पहिलाच सामना असेल. पीसीबीकडून सांगण्यात आले की, आगा झिम्बाब्वे दौऱ्यात टी-२० संघाचे नेतृत्व करणार आहे. कारण रिझवानला कार्यभार योजनेनुसार विश्रांती देण्यात येणार आहे. पाकिस्तानचा संघ २४ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत झिम्बाब्वे दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे. बाबर आझम, वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटीत बाहेर राहिल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात पुनरागमन केले आहे. 

शाहीन आफ्रिदीची करारात घसरगुंडी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने रविवारी २०२४-२५ सत्रासाठी जाहीर केलेल्या केंद्रीय करारात वेगवान गोलंदाज शाहीनशाह आफ्रिदीची 'अ' गटातून 'ब' गटात घसरण झाली आहे; तर वरिष्ठ खेळाडू फखर जमान, इफ्तिकार अहमद आणि ओसामा मीर यांना केंद्रीय करारातून बाहेर करण्यात आले आहे. इंग्लंडवर २-१ असा मालिका विजय साकारल्यानंतरही कसोटी कर्णधार शान मसूद 'ब' गटात कायम आहे. 

टॅग्स :पाकिस्तानबाबर आजम