नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही संघ आपल्या मायदेशात टी-20 मालिका खेळत आहेत. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. तर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाकिस्तानच्या धरतीवर 7 टी-20 सामन्यांची मालिका रंगली आहे. आतापर्यंत मालिकेतील 4 सामने पार पडले असून दोन्ही संघ सध्या 2-2 अशा बरोबरीत आहेत. अशातच पाकिस्तान आणि भारत या दोन्ही संघाना आयसीसीने मोठी भेट दिली आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
बाबर आझमची झाली घसरण दरम्यान, पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान पहिल्या स्थानावर विराजमान आहे. रिझवान सध्या शानदार फॉर्ममध्ये असून आपल्या घरच्या मैदानावर तो धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने इंग्लंडविरूद्धच्या मागील 4 सामन्यांमध्ये दोन वेळा अर्धशतक झळकावले. तर भारताच्या सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात 36 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी केली होती. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर स्थित आहे. फिंचने नागपूर येथील सामन्यात 31 धावांची साजेशी खेळी केली होती. इंग्लंडचा युवा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूक फलंदाजीच्या क्रमवारीत 29व्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्रूकने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे, त्याने कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यांमध्ये 31, 81* आणि 34 अशा धावा केल्या आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला असून सध्या मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. तर भारतीय संघाने कांगारूच्या संघाला 2-1 ने चितपट करून विश्वचषकापूर्वी विजयी सुरूवात केली आहे. भारतीय संघ आजपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 मालिका खेळणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - पहिला टी-20 सामना - 28 सप्टेंबर (तिरुवनंतपुरम)दुसरा टी- सामना - 2 ऑक्टोबर (गुवाहाटी)तिसरा टी-20 सामना - 4 ऑक्टोबर (इंदूर)पहिला एकदिवसीय सामना - 6 ऑक्टोबर (लखनौ)दुसरा एकदिवसीय सामना - 9 ऑक्टोबर (रांची)तिसरा एकदिवसीय सामना - 11 ऑक्टोबर (दिल्ली)