Join us  

"५व्या क्रमांकावर खूश नाही...", मोहम्मद रिझवानची उघड नाराजी; पाकिस्तानी संघात वादंग

nz vs pak : पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 6:53 PM

Open in App

Mohammad Rizwan । नवी दिल्ली :  पाकिस्तानी संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध (PAK vs NZ) वन डे मालिका खेळत आहे. किवी संघाचे वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. पाकिस्तानने पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून शानदार सुरूवात केली आहे. पाकिस्तानकडून इमाम-उल-हक आणि फखर झमान आताच्या घडीला सलामीवीर म्हणून खेळत आहेत. फखरने सलामीवीर म्हणून बाबर-रिझवानपेक्षा चांगली फटकेबाजी करू शकतो, असे म्हटले असतानाच आता रिझवाननेही नव्या वादाला सुरुवात केली आहे. यष्टीरक्षक फलंदाजाने वन डे मध्ये पाचव्या क्रमांकावर खेळण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मोहम्मद रिझवान न्यूझीलंडविरूद्धच्या चालू मालिकेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली असून दोन सामन्यांमध्ये ९६ धावा केल्या आहेत. ३ मे रोजी होणार्‍या तिसर्‍या सामन्यापूर्वी सोमवारी कराची येथे पत्रकार परिषदेत रिझवानने म्हटले, "वैयक्तिकरित्या मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास इच्छुक आहे. मला चौथ्या क्रमांकावर खेळायचे आहे, पण माझ्या इच्छेने काही फरक पडत नाही. अंतिम निर्णय कर्णधार आणि प्रशिक्षकांचा आहे आणि तो आम्हाला मान्य करावा लागेल. मी याबाबत कोणाकडेही तक्रार केलेली नाही. खेळाडूला हवे तेच मिळते असे नाही. पण मी पाचव्या क्रमांकावर खेळताना खूश नाही." 

टीकाकारांना सुनावले बाबर-रिझवानला त्यांच्या फलंदाजीबाबत अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. याबाबत बोलताना रिझवानने टीकारांचा चांगलाच समाचार घेतला. "टीकाकारांना सलाम, जर ते पाकिस्तानबद्दल विचार करत असतील तर ते चांगले आहे कारण चांगल्या टीका आमचा खेळ उंचावतात. आम्ही यंदा विश्वचषकासाठी जाणार आहोत. विश्वचषक हा २० खेळाडूंसाठी नसून तो मीडियासह सर्वांसाठी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे दडपण आहे आणि आम्हाला ते हाताळण्याची सवय आहे." तसेच पाकिस्तानची जवळपास २५ कोटी लोकसंख्या आहे आणि १०-१२ कोटी समीक्षक (मिश्किलपणे) असल्याचे रिझवानने यावेळी म्हटले. 

पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड वन डे मालिका 

  1. २७ एप्रिल - पहिला वन डे सामना, रावळपिंडी
  2. २९ एप्रिल - दुसरा वन डे सामना, कराची
  3. ३ मे - तिसरा वन डे सामना, कराची
  4. ५ मे - चौथा वन डे सामना, कराची
  5. ७ मे - पाचवा वन डे सामना, कराची

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडआंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबर आजम
Open in App