किस्तानच्या ताफ्यातील प्रमुख फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याची इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील सुरुवात अगदी खराब झाली. मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानचा संघ अगदी सुस्थितीत असताना सातव्या क्रमांकावर रिझवान बॅटिंगला आला. जॅक लीचच्या (Jack Leach) गोलंदाजीवर तावातावानं पुढे येऊन फटका मारला. पण त्याने मारलेला चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला अन् त्याची चांगलीच फजिती झाली. १२ चेंडू खेळून त्याला शून्यावर माघारी परतावे लागले.
रिझवानच्या नावे झाला सर्वाधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम
घरच्या मैदानातील कसोटी सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावे जमा झाला आहे. एकंदरीत विचार करता सर्वाधिक चेंडूचा सामना केल्यावर खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानी विकेट बॅटरच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
सर्वाधिक चेंडू खेळून खाते न उघडता माघारी फिरलेले पाक विकेट किपर बॅटर (Slowest duck by a Pakistan wicketkeeper in Tests)
- १३ चेंडू- वासीम बारी (Wasim Bari) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, १९७३
- १३ चेंडू- कामरान अकमल (Kamran Akmal) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ २००४
- १३ चेंडू- कामरान अकमल (Kamran Akmal) विरुद्ध भारत, कोलकाता २००५
- १२ चेंडू- मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) विरुद्ध इंग्लंड, मुल्तान
अन् रिझवान जाळ्यात फसला
पाकिस्तानचा संघ चारशे पारच्या उंबरठ्यावर पोहचला असताना पहिल्या डावातील १०९ व्या षटकात शकीलनं एकेरी धाव घेत रिझवानला स्ट्राइक दिले. जॅक लीच यानं सलग तीन चेंडू निर्धाव टाकत रिझवानला बॅकफूटवर ढकलले. पाचव्या चेंडूवर रिझवानचा संयम सुटला क्रिज सोडून बाहेर येत त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला अन् तो फसला. त्याने मारलेला चेंडू थेट मिड-ऑफला फिल्डिंगसाठी उभारलेल्या क्रिस वोक्सच्या हातात गेला. इंग्लंडच्या या गोलंदाजाने टिपलेला हा झेल कॅचिंग प्रॅक्टिस प्रमाणेच होता.
कसोटी कारकिर्दीत चौथ्यांदा आली अशी वेळ
पाकिस्तानच्या संघाने ३८८ धावांवर पाचवी विकेट गमावल्यावर रिझवान मैदानात आला होता. परिस्थितीत आपल्या बाजूनं असतानाही त्याला चांगला खेळ करता आला नाही. कसोटी कारकिर्दीत रिझवान चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. याआधी मार्च 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लाहोर कसोटीत त्याच्या पदरी भोपळा पडला होता.