नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) पाकिस्तानचा संघ शानदार लयनुसार खेळत आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानने 3 सामन्यात 2 अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली आहे. रिझवानने आशिया चषकात अनुक्रमे 78 नाबाद आणि 71 धावा केल्या आहेत. 3 सामन्यांमध्ये एकूण 192 धावा करून मोहम्मद रिझवानने पाकिस्तानच्या फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. अशातच आयसीसीने रिझवानला एक मोठे गिफ्ट दिले आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकून पहिले स्थान पटकावले आहे.
दरम्यान, या यादीत बाबर आझमची दुसऱ्या तर भारताच्या सूर्यकुमार यादवची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर एडन मार्करमचा नंबर लागला आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात मोहम्मद रिझवान शानदार फॉर्ममध्ये आहे. रिझवानने भारताविरूद्धच्या सामन्यात 71 धावांची खेळी करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. लक्षणीय बाब म्हणजे मोहम्मद रिझवान तिसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे ज्याने आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.
यापूर्वी पाकिस्तानच्या संघातील बाबर आझम आणि मिस्बाह उल-हक यांनी ही किमया साधली होती. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम त्याच्या कारकिर्दीत (7 सप्टेंबरपर्यंत) 1,155 दिवस टी-20 फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला आहे.