नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfraz Ahmed) सध्या पाकिस्तान क्रिकेटपासून दूर आहे. सरफराजला आंतरराष्ट्रीय संघातून वारंवार वगळले जात आहे. तो सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. खरं तर आताच्या घडीला त्याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण विकेटकिपर म्हणून पाकिस्तानी संघात मोहम्मद रिझवानची (Mohammad Rizwan) जागा निश्चित आहे.
दरम्यान, मोहम्मद रिझवान आणि सरफराज अहमद यांच्यातील दरी आणखी वाढेल असा धक्कादायक खुलासा पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केला आहे. माजी क्रिकेटर सिकंदर बख्तने सरफराजचे संघात पुनरागम होणे अशक्य असल्याचा दावा केला आहे. कारण मोहम्मद रिझवानने सरफराजला पुन्हा संघात येऊन देणार नसल्याचे सांगितले आहे, असे त्याने म्हटले आहे.
पाकिस्तानी चॅनेल जिओ सुपरशी बोलताना सिकंदर बख्तने सरफराजच्या क्रिकेट करिअरबद्दल भविष्यवाणी केली आहे. "सरफराज आता पाकिस्तानी संघात खेळणार नाही. आमचा क्रिकेट समुदाय फारच लहान आहे, त्यामुळे आम्हाला भरपूर माहिती मिळत असते", असे सिकंदरने म्हटले.
सिकंदर बख्तचा मोठा खुलासा "एका क्रिकेटरने माझ्यासोबत एका कार्यक्रमात भाग घेतला होता. तेव्हा त्याने मला सांगितले होते की रिझवानने म्हटले आहे की, मी सरफराजला परत कधीच संघात येऊन देणार नाही. कारण जेव्हा संघाची धुरा सरफराजकडे होती तेव्हा त्याने त्याला कधीच खेळू दिले नव्हते. मात्र आता सगळं काही उलट होत आहे, हे सर्व मी ऐकले आहे जरी मी चुकीचा असलो तरी", असा गौप्यस्फोट सिकंदर बख्तने केला आहे.
2019 नंतर रिझवान पाकिस्तानच्या संघाचा हिस्सामोहम्मद रिझवानने एप्रिल 2015 मध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याची संघातील जागा निश्चित नव्हती. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर रिझवानची पाकिस्तानच्या संघातील जागा निश्चित झाली. आता तो पाकिस्तानी संघातील प्रमुख चेहरा बनला आहे. तर सरफराज अहमदने मागील वर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2021 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर 2019 पासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला नाही.