भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. या हंगामात मोहम्मद शमी त्याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. मात्र यादरम्यान, मोहम्मद शमीवर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. मोहम्मद शमीने हॉटेलमध्ये महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवले होते, असा दावा त्याची पत्नी हसीन जहाँ हिने केला आहे.
मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ हे वादामुळे बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत. दरम्यान, आता हसीन जहाँ हिने सुप्रीम कोर्टात धाव घातली आहे. तिने स्पेशल लिव्ह पीटिशन दाखल करून मोहम्मद शमीविरोधात दाखल केलेली फौजदारी प्रकरणातील याचिका चार वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा केला आहे. मोहम्मद शमीचे विवाहबाह्य संबंध अजूनही सुरू असून, शमीने आपल्याकडे हुंड्याचीही मागणी केली होती, असा आरोप केला आहे. मोहम्मद शमी हा भारतीय संघासोबत दौऱ्यावर असताना विवाहबाह्य संबंध ठेवतो, असा आरोप तिने केला आहे. तसेच बीसीसीआयच्या टूरवर शमी दुसऱ्या क्रमांकाचा वापर करून अय्याशी करतो, असा दावाही तिने केला आहे.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह ७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. त्यानंतर काही वर्षांनी शमीच्या पत्नीने त्याच्यावर इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. तसेच शमीवर बलात्कारासारखा गंभीर आरोपही तिने केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये शमीवर हसीन जहांने केलेल्या मारहाण, बलात्कार, जिवे मारण्याचा प्रयत्न, कौटुंबिक हिंसा या आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावाविरोधात खटला दाखल केला होता.
दरम्यान, हसीन जहाँ ही पेशाने प्रोफेशनल मॉडेल होती. तसेच तिने कोलकाता नाईटरायडर्सची चियर लिडर म्हणूनही काम पाहिले होते. ती तिच्या फिटनेसकडेही खूप लक्ष देते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. दरम्यान, हसीन जहाँचे हे दुसरे लग्न आहे हे मोहम्मद शमीला नंतर कळले होते. तिच्या पहिल्या पतीचं नाव सैफुद्दीन आहे. शमी १७ जुलै २०१५ रोजी एका मुलीचा पिता बनला होता.