Mohammad Shami, Team India, IND vs AUS: भारतीय संघाला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार शमी कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. NCA मध्ये पुनर्वसनाच्या कालावधीत शमीच्या गुडघ्याला सूज आली. त्यामुळे तो पुढील ६-८ आठवडे मैदानाबाहेर राहू शकतो. नोव्हेंबर २०२३च्या विश्वचषक फायनलनंतर शमीने एकही सामना खेळलेला नाही. डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी त्याची निवड झाली होती, परंतु BCCIच्या वैद्यकीय समितीने मंजुरी न दिल्याने त्याला या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली होती.
वैद्यकीय टीम काय म्हणाली?
शमी न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पण आता ती गोष्ट काहीशी कठीण वाटत आहे. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. अहवालात म्हटले आहे की, एनसीएच्या वैद्यकीय पथकासाठी हा धक्का आहे. ते त्याच्यावर एक वर्षापेक्षा जास्त काळ काम करत आहेत. त्यांच्याकडे वर्कलोड मॅनेजमेंटची सर्वोत्तम प्रणाली आहे. वैद्यकीय टीमला शक्य तितक्या लवकर त्याला मैदानावर परत आणण्याचे प्रयत्न करेल.
बुमराहला विश्रांती देण्याची दाट शक्यता
१६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मायदेशातील मालिकेसाठी निवडकर्ते बुमराहची निवड करतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कारण त्याला विश्रांती दिली जाण्याची तीव्र शक्यता आहे. त्याला ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी पुन्हा मैदानात आणले जाईल. अशा परिस्थितीत शमी संघात नसल्याने भारताच्या युवा गोलंदाजांना संधी मिळेल. पण अनुभवाची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे.
२३ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया मालिका
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यापूर्वी शमीला कसोटी सामन्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल अशी आशा निवडकर्त्यांना आहे. पण त्याच्या दुखापतीमुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २३ नोव्हेंबरला पर्थमध्ये होणार आहे. भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.