भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाचा वन डे विश्वचषक गाजवला असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. स्पर्धेच्या सुरूवातीला प्रतीक्षेत असलेल्या शमीला संधी मिळताच त्याने संधीचं सोनं केलं. स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात 'पंजा' मारून आपली ताकद दाखवण्यात त्याला यश आलं. त्यानंतर शमीचा हा दबदबा वाढतच गेला अन् भारतानं मोठ्या फरकानं सामने जिंकले. न्यूझीलंडविरूद्धच्या उपांत्य सामन्यात तर शमीने ७ बळी घेऊन संघाला फायनलचं तिकिट मिळवून दिलं. पण, विश्वचषक गाजवणारा शमी अंतिम सामन्यातील पराभवानंतर भावूक दिसला. मात्र आता त्यानं माजी पाकिस्तानी खेळाडूंना सुधरण्याचा सल्ला वजा इशारा दिला आहे.
भारतीय संघाचा विजयरथ पाहून बिथरलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी हास्यास्पद विधानं करून प्रसिद्धी मिळवली. पाकिस्तानी संघाला खास कामगिरी करता न आल्याने पाकिस्तानचे माजी खेळाडू अजब दाखले देत होते. बीसीसीआय भारताचे सामने ठरवून वेगळ्या खेळपट्टीवर घेत असल्याचे काहींनी सांगितले. पाकिस्तानचा माजी खेळाडू सिकंदर बख्तने तर कमालच केली. त्यानं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टॉसमध्येच चिटींग करत असल्याचा आरोप केला. बख्तच्या या वादग्रस्त विधानानं नव्या वादाला तोंड फुटले, मात्र पाकिस्तानचा दिग्गज वसिम अक्रमने याप्रकरणी नाराजी व्यक्त करत बख्तच्या विधानाची खिल्ली उडवली.
माजी पाकिस्तानी खेळाडूंना सुनावले शमीनं पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचा दाखला देत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. माजी खेळाडू हसन रझाने आयसीसीवर प्रश्न उपस्थित करत भारतीय संघाला सामन्यादरम्यान वेगळा चेंडू मिळत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भारत प्रतिस्पर्धी संघाला स्वस्तात तंबूत पाठवत असल्याचा दावा देखील त्याने केला.
अब तो सुधर जाओ यार...!विश्वचषकादरम्यान माजी पाकिस्तानी खेळाडूंनी केलेली हास्यास्पद विधानं मोहम्मद शमीला खटकली. शमीने म्हटले की, काही माजी खेळाडू भारतीय संघाच्या गोलंदाजी अटॅकवर प्रश्न उपस्थित करत आहेत... पण, मला वाटते की जो खेळाडू महत्त्वाच्या सामन्यात चांगली कामगिरी करतो तोच 'बेस्ट' असतो. मात्र काहींना मुद्दामहून वाद निर्माण करायचा आहे. चेंडूचा रंग, फिक्सिंग आणि टॉसमध्ये चिटींग असे बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. मी त्यांना एवढंच सांगेन की त्यांनी आता तरी सुधरायला हवं... वसिम भाईने (अक्रम) देखील एका कार्यक्रमात याबद्दल भाष्य केले असून आपल्या खेळाडूंच्या विधानाची खिल्ली उडवली. ते माजी खेळाडू असून अशा गोष्टी बोलतात हे अशोभनीय आहे. शमीने 'पुमा'ला दिलेल्या मुलाखतीत तो याबद्दल बोलत होता.
"मी संपूर्ण स्पर्धेदरम्यान केलेली कामगिरी त्यांना खटकली आणि ते काहीही बोलत सुटले. त्यांना वाटते की, आपल्याच संघात बेस्ट गोलंदाज आहेत... पण मोठ्या व्यासपीठावर संघासाठी चांगली कामगिरी करतो तोच माझ्या दृष्टीने बेस्ट आहे", असे शमीने अधिक सांगितले.