Join us  

‘पनौतीमुळे वर्ल्डकप हरलो?’, प्रश्नकर्त्याला मोहम्मद शमीनं दिलं असं उत्तर, म्हणाला...

Mohammad Shami : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींचा उल्लेख पनौती असा केल्यापासून वाद अधिकच वाढला आहे. दरम्यान, आता भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचीही या वादाबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:02 PM

Open in App

नुकत्याच आटोपलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात सपशेल अपयशी ठरला. या सामन्याच्या अखेरीस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हेही स्टेडियममध्ये उपस्थित होते. दरम्यान, या सामन्यात भारताचा पराभव झाल्यापासून राजकारण सुरू झाले आहे. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींचा उल्लेख पनौती असा केल्यापासून वाद अधिकच वाढला आहे. दरम्यान, आता भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचीही या वादाबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक २४ बळी टिपणारा मोहम्मद शमी त्याच्या घरी अमरोहा येथे पोहोचल्यावर प्रसारमाध्यमांनी त्याला घेरले. तसेच स्टेडियममध्ये पनौती होती त्यामुळे भारत पराभूत झाला, अशा राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले. तेव्हा मोहम्मद शमी म्हणाला की, पाहा वादग्रस्त प्रश्न आम्हाला समजत नाहीत. कारण तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न वादामध्ये घेऊन जाता.

शमी पुढे म्हणाला की, बेसिक गोष्टींवर लक्ष द्या, ज्यावर तुम्ही पूर्ण दोन महिने मेहनत घेतली आहे, त्यावर लक्ष द्या. हा राजकीय अजेंडा मध्ये का आणता. ही बाब आम्हाला समजत नाही, असे शमीने सुनावले. दरम्यान, काँग्रेसने पनौतीवरून सुरू केलेल्या टीकेनंतर भाजपानेही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच माजी पंतप्रधाम इंदिरा गांधींबाबत प्रियंका गांधी यांचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर सर्वच खेळाडू दु:खी आणि निराश झाले होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूममध्ये जात खेळाडूंचं सांत्वन केलं होतं. तसेच त्यांना धीर दिला होता. यादरम्यान, मोदींनी संघातील वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघाला धीर देण्यास सांगितले होते. तुम्ही सर्वंनी खूप चांगला खेळ केलाय, १०-१० सामने जिंकले आहेत. असं होतच असतं, असं मोदी म्हणाले होते. तसेच यावेळी मोदींनी शमीची गळाभेट घेत त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं होतं.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद शामीनरेंद्र मोदीराहुल गांधी