भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षी पार पडलेल्या वन डे विश्वचषकात शमीने चमकदार कामगिरी करून सर्वाधिक बळी घेण्याचा मान पटकावला. शमीवर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली, त्यामुळे तो आगामी आयपीएलला मुकणार आहे. अलीकडेच बीसीसीआयने माहिती देताना सांगितले की, रिषभ पंत पुनरागमनासाठी सज्ज असून शमी विश्रांती घेत आहे. आता खुद्द शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट दिली आहे.
शमीने रूग्णालयातील त्याचे काही फोटो शेअर करत म्हटले की, सर्वांना नमस्कार... माझ्या शस्त्रक्रियेला १५ दिवस झाले आहेत आणि नुकतेच माझे टाके काढण्यात आले आहे. आतापर्यंत सर्वकाही चांगले झाले असून मी समाधानी आहे. माझ्या पुढील उपचारासाठी मी उत्साहित आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रिषभ पंत, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या तंदुरुस्तीबाबत मोठे अपडेट्स दिले. ३० डिसेंबर २०२२ रोजी उत्तराखंडमधील रुरकीजवळ झालेल्या जीवघेण्या रस्ते अपघातानंतर क्रिकेटपासून दूर असलेला रिषभ पंत (Rishabh Pant) आयपीएल २०२४ मध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. १४ महिन्यांच्या पुनर्वसन आणि पुनर्प्राप्ती प्रक्रियेनंतर रिषभ पंतला आता आगामी IPL 2024 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तंदुरुस्त घोषित करण्यात आले.
खरं तर रिषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणार की, फक्त फलंदाज म्हणून... याचेही उत्तर मिळाले आहे. तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयने जाहीर केल्यावर दिल्ली कॅपिटल्सने आनंद व्यक्त केला. तर, अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला मोहम्मद शमी मुकला. तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. सप्टेंबरमध्ये भारत-बांगलादेश यांच्यात दोन कसोटी आणि तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.