कोलकाता : भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागला आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचे व्हिडीओ पाहून शमी ऑस्ट्रेलियात गोलंदाजी कशी करावी याचा अभ्यास करत आहे. इंग्लंड दौऱ्यावर शमीने आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित केले होते. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही छाप सोडायची आहे.
"इंग्लंड दौऱ्यावर जलदगती गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय झाली होती. ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी सज्ज होताना आणि तेथे कशी गोलंदाजी करता येइल याचे व्हिडीओ पाहत आहोत. संपूर्ण मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे योग्य दिशेने आणि वेगाने गोलंदाजी करण्यावर आमचा भर असेल," असे शमीने सांगितले.
वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी व वन डे मालिकेत शमीचा भारतीय संघात समावेश होता. तो म्हणाला," आम्ही नेहमी सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असतो. शेवटी जय पराजय हा नशिबाचा भाग आहे. आम्ही आमचे १०० टक्के योगदान देण्याचे काम करतो." भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. २१ नोव्हेंबरपासून ट्वेंटी-२० सामन्यातून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.