कोलकाता : भारताचा वेगावान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले होते. पण आता तर तिने टोक गाठले आहे. शामीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत, असे वक्तव्य हसीनने केले आहे. पण या वक्तव्यानंतर हसीन टीकेची धनी ठरत आहे.
शामीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे आरोप केले आहेत. दरम्यान या प्रकारामुळे शामीचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शामीचे काही तरुणींसोबतचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्या तरुणी शामीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमधील प्रेयसीकडून शामी पैसे घेतो आणि देशाला धोका देत आहे, असेही हसीनने सांगितले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या अलिश्बाने मी फक्त शामीची चाहती आहे आणि तो कधीही देशाला धोका देऊ शकत नाही, असे म्हटले होते.
हसीन आज म्हणाली की, " अलिश्बा ही काही शामीची चाहती वैगेरे नक्कीच नाही. ती शामीची प्रेयसी आहे, जर लपून-छपून एक मुलगी पुरुषाला भेटत असेल तर हे प्रकरण फक्त ब्रेकफास्टपर्यंत थांबणार नाही, तर हे प्रकरण अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचलेले आहे. शामीने बऱ्याच मुलींच्या आयुष्याशी खेळ केला आहे. त्याने बऱ्याच मुलींना नासवले आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या व्यक्तीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत. "ती पुढे म्हणाली की, " शामी आणि अलिश्बा यांना दुबईमध्ये भेटायचे होते. त्यासाठी त्यांनी जानेवारीपासून प्लॅनिंग केले होते. अलिश्बा ही चरीत्रहीन बाई आहे, तर शामीदेखील काही कमी नाही. या दोघांनी मिळून बऱ्याच वाईट गोष्टी केल्या आहेत. त्यामुळेच अलिश्बा ही शामीची बाजू घेत आहे. "