अत्यंत एकतर्फी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल ३१७ धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत लंकेला ३-० असा क्लीनस्वीप दिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्याबाबतीत सर्वात मोठा विजय मिळवताना भारताने न्यूझीलंडचा (आयर्लंडविरुद्ध २९० धावांनी विजय) विक्रम मोडला. तसेच तिनशेहून अधिक धावांनी एकदिवसीय विजय मिळवणारा भारत क्रिकेटविश्वातील पहिला संघ ठरला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत पाच बाद ३९० धावा उभारल्यानंतर लंकेला २२ षटकांत केवळ ६३ धावांमध्ये गुंडाळले. विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या तडाखेबंद शतकानंतर मोहम्मद सिराजने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने लंकेचा दारुण पराभव केला. सिराजने ३२ धावांत ४ विकेट्स घेत लंकेची दाणादाण उडवली. मात्र या ४ विकेट्ससोबतच एक फलंदाज देखील रन आउट केला. सध्या सोशल मीडियावर या रन आउटची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.
१२व्या षटकातील चौथा चेंडू सिराजने लंकेचा सलामीवीर चमिका करुणारत्नेला टाकला. यावर फलंदाजाने सरळ बॅटने बचावात्मक शॉट खेळला, त्यामुळे चेंडू थेट सिराजपर्यंत पोहोचला. यानंतर सिराजने लगेच स्टम्पच्या दिशेने चेंडू फेकला आणि रन आउट केले. करुणारत्नेला याचा अंदाजही नव्हता की सिराज स्टम्पच्या दिशेने चेंडू भिरकावेल. या विकेट्सनंतर विशेषतः विराट कोहलीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. या चेंडूपूर्वी सिराज आणि करुणारत्ने यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर लगेचच सिराजने अनोख्या पद्धतीने करुणारत्नेला रन आउट करत जोरदार सेलिब्रेशन केले.
दरम्यान, रोहित शर्मा ( ४२) व शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. रोहित माघारी परतल्यानंतर शुभमन व विराट यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई सुरू केली. गिलने ९७ चेंडूत ११६ धावांच्या खेळी साकारताना १४ चौकार आणि २ षटकार खेचले. विराटने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७४वे शतक पूर्ण केले आणि वन डे तील हे त्याचे ४६ वे शतक ठरले. यासह त्याने घरच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. विराट आणि शुभमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. किंग कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार व ८ षटकारांसह १६६ धावा चोपल्या. श्रेयस अय्यर (३८) धावांची साजेशी खेळी केली. भारताने ५ बाद ३९० धावांचा डोंगर उभा केला.