Join us  

रिझवाननं सेंच्युरीसह एक डाव साधला; पण एका बाबतीत पंत अजूनही टॉपला

रिझवान याने पंतला मागे टाकण्याचा एक डाव साधला असला तरी एका बाबतीत पंत अजूनही त्याच्या एक पाऊल पुढेच आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 5:23 PM

Open in App

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी विकेट किपर बॅटर मोहम्मद रिझवान याने शतक झळकावले. या शतकासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत विकेट किपर बॅटरच्या रुपात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावे झाला आहे. पंतला मागे टाकतं तो या यादीत अव्वलस्थानी पोहचला आहे. सेंच्युरीसहग रिझवान याने पंतला मागे टाकण्याचा एक डाव साधला असला तरी एका बाबतीत पंत अजूनही त्याच्या एक पाऊल पुढेच आहे.  

८९० दिवसांनी संपला रिझवानचा शतकी दुष्काळ

मोहम्मद रिझवान याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात बऱ्याच वर्षांचा शतकी दुष्काळ संपवला. कसोटीतील त्याचे तिसरे शतक ८९० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पाहायला मिळाले. याआधी मार्च  २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कराची कसोटीत रिझवानने शतकी खेळी केली होती. 

WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा विकेट किपर बॅटर ठरला रिझवान   आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत  मोहम्मद रिझवान याने पंतला मागे टाकले. पंतच्या खात्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १५७५ धावा जमा आहेत. मोहम्मद रिझवान याने विकेट किपर बॅटरच्या रुपात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत १७०० धावा करण्याचा टप्पा पार केला आहे. २८ सामन्यातील ४५ डावात त्याने हा पल्ला गाठला आहे.  सर्वाधिक वेळा ५० + धावा करण्यात पंत आघाडीवर 

भारतीय विकेट किपर बॅटर अपघातामुळे जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. २४ सामन्यातील ४१ डावात त्याने १५७५ धावा केल्या आहेत. यात ३ शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. रिषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत आतापर्यंत १२ वेळा ५० + धावा केल्या आहेत. याबाबतीत रिझवान त्याच्या मागे आहे. रिझवाननं ११ वेळा अशी कामगिरी केली आहे.  पाकिस्तान दौरा आटोपल्यानंतर  बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पंत पुन्हा कमबॅक करेल, अशी आशा आहे. त्यामुळे रिझवान आणि पंत यांच्यातील स्पर्धा अगदी रंगतदार होईल, असे चित्र दिसते.  

 

टॅग्स :रिषभ पंतपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघबांगलादेश