रणजी क्रिकेटच्या मैदानातून मोहम्मद शमीनं अगदी दमदार कमबॅक केले आहे. इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातील सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना मोहम्मद शमीसाठी खूपच खास आहे. कारण वर्षभरानंतर तो क्रिकेटच्या मैदानात उतरलाय. भारतात पार पडलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर होता.
कमबॅक मॅचमध्ये शमीची दमदार कामगिरी, इथं पाहा व्हिडिओ
कमबॅक मॅचमधील पहिल्या दिवशी मोहम्मद शमी थोडा फिकाच ठरला. १० षटके गोलंदाजी करूनही त्याला विकेट मिळाली नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या गोलंदाजीत धार दिसून आली. मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीनं एकूण १९ षटके टाकली. यात ४ निर्धाव षटकासह ५४ धावा खर्च करत त्याने ४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या कडक स्पेलची झलक दाखवणारा व्हिडिओ अधिकृत एक्स अकाउंटवरुन रिपोस्ट केला आहे. कमबॅकसाठी फक्त शमीच नाही तर बीसीसीआयही उत्सुक असल्याचेच यातून दिसून येते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळणार?
भारतीय संघ सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दुखापतीतून रिकव्हर न झाल्यानंत शमीला या दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पण आता तो रणजीच्या मैदानात उतरला असून त्याचा कडक स्पेल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियासाठीही दिलासा देणारा आहे. दमदार कमबॅक आणि १०० टक्के फिट असल्याचे सिद्ध करून मोहम्मद शमी या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहचल्याचे पाहायला मिळू शकते.
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळला होता अखेरचा सामना
मोहम्मद शमीनं टीम इंडियाकडून अखेरचा सामना हा १९ नोव्हेंबर २०२३ रोजी खेळला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत दुखापतीनंतर इंजेक्शन घेऊन मोहम्मद शमी मैदानात उतरला. ही गोष्ट त्याला स्पर्धा संपल्यावर महागात पडली. शस्त्रक्रिया करण्याची परिस्थिती ओढावल्यावर वर्षभर रिकव्हर होण्यात घालवावे लागले. जबरदस्त कमबॅकसह तो टीम इंडियात एन्ट्री मारण्यासाठी तयार असल्याचे दिसते.
Web Title: Mohammed Shami Back Picks Four Wickets In Comeback Match Bengal vs MP Ranji Trophy BCCI Share Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.