वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या काही सामन्यात बाकावर बसवण्यात आलेल्या प्रश्नावर मोहम्मद शमीनं आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली आहे. स्पोर्ट्स अँकरमयंती लँगर हिने त्याला एका कार्यक्रमात यासंदर्भात प्रश्न विचारला होता. यावर मोहम्मद शमीचे बोल ऐकल्यावर रोहित शर्माने डोक्याला हात लावल्याचा सीनही पाहायला मिळाला. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात शमी प्लेइंग इलेव्हनचा भागच नव्हता. हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर त्याला संधी मिळाली आणि त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली होती.
द्रविड-रोहितच्या समोर शमी मोकळेपणानं बोलला
भारतीय क्रिकेट संघाच्या ताफ्यातील स्टार गोलंदाज मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कपपासून संघा बाहेर आहे. दुखापतग्रस्त असताना टीम इंडियासाठी खेळत त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती. दुखणं घेऊन खेळणं त्याला चांगलेच महागातही पडले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. आता तो कमबॅकसाठीही सज्ज आहे. पण संघात येण्याआधी त्याने वर्ल्ड कप स्पर्धे दरम्यानची ड्रेसिंगरुमच्या आतली गोष्ट शेअर केलीये. तेही अगदी रोहित शर्मा आणि तत्कालीन कोच द्रविड ही मंडळी समोर बसलेली असताना.
मयंती लँगरसोबतच्या गप्पा गोष्टीचा व्हिडिओ चर्चेत
काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या सीएट क्रिकेट अवॉर्ड्समध्ये मोहम्मद शमी सहभागी झाला होता. अँकर मयंती लँगरसोबतच्या गप्पा गोष्टींचा खास व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केले आहे. यात तो वनडे वर्ल्ड कपमध्ये बाकावर बसवल्याच्या गोष्टीवर बोलल्याचे पाहायला मिळते. जो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्या स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर ही भारताच्या स्टार गोलंदाजाला त्याच्या प्रवासाबद्दल विचारताना दिसते. यावेळी तिने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात बाकावर बसवले असताना संधीच सोनं करण्यासाठी कशी तयारी केलीस? असा प्रश्न विचारला होता.
काय म्हणाला शमी?
मयंतीच्या या प्रश्नावर मोहम्मद शमीने अगदी बिनधास्त आणि आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. ते माझ्यासोबत पहिल्यांदा घडलं नव्हते. २०१५, २०१९ आणि २०१३ तिन्ही वनडे वर्ल्ड कप वेळी मी टीम व्यवस्थापनासाठी गोलंदाजांच्या रुपात पहिली पसंती नव्हतो. मला त्याची सवय झाली आहे. पण ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी मी पुन्हा मला बाहेर काढण्याची संधी त्यांना दिली नाही, अशा आशयाच्या शब्दांत शमीनं कडक रिप्लाय दिला. मी नेहमीच संधीची वाट पाहत असतो. ती मिळाली तरच स्वत:ला सिद्ध करू शकतो. नाहीतर मी फक्त पाणी देण्यापूरतेच मैदानात पळू शकतो, असा उल्लेखही त्याने यावेळी केला.