ICC ODI World Cup 2023 स्पर्धेत भारतीय संघाची गाडी सूसाट पळत आहे. भारताने ८ पैकी ८ सामने जिंकून अपराजित्व कायम राखले आहे. भारतीय संघाचे हे यश पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना खटकत आहेत आणि ते बीसीसीआयवर आरोप करताना दिसत आहेत. भारतीय गोलंदाजांसमोर भले भले फलंदाज शेपूट घालताना पाहायला मिळतेय आणि त्यामुळेच भारतीय गोलंदाजांना वेगळ्या प्रकारचा चेंडू दिला गेल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी खेळाडू हसन रझा याने केला होता. त्याला पाकिस्तानचा माजी महान गोलंदाज वसीम अक्रम यानेही झापले होते. त्यात आता भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने त्याची बोलती बंद केली आहे.
भारताने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत श्रीलंकेचा संपूर्ण संघ मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी ५५ धावांत तंबूत पाठवला. भारताने १९.४ षटकांत श्रीलंकेचा संघ माघारी पाठवून ३०२ धावांनी मोठा विजय मिळवला. त्यानंतर हसन रझा ( Hasan Raza) याने भारतीय गोलंदाजांना सामन्यात दिल्या जाणाऱ्या चेंडूबाबत चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानी चॅनेलवर त्याने ही मागणी केली आहे.
''शमी आणि सिराज हे गोलंदाज आम्ही ज्यांचा सामना केलाय अॅलेन डोनाल्ड व मखाया एनटीनी यांच्यासारखी गोलंदाजी करत आहेत. भारताविरुद्ध हे फलंदाजांची कामगिरी अशी का होतेय, हेच समजत नाही. चेंडू वेगाने येतोय आणि स्वींग होतोय. चेंडूच्या एकाबाजूला खूप शाईन दिसतेय. दुसऱ्या डावात चेंडू बदलला जातोय. आयसीसी किंवा तिसरा अम्पायर किंवा बीसीसीआय वेगळ्या प्रकारचा चेंडू भारतीय गोलंदाजांना देतोय. याचा तपास व्हायला हवा,''असे रझा म्हणाला.
या रझाला शमीने सडेतोड उत्तर दिले आहे. शमीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. फालतू गोष्टींपेक्षा खेळावर लक्ष द्या. दुसऱ्यांचा यशातही आनंद साजरं करायला शिका. ही आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा आहे, तुमची लोकल स्पर्धा नाही. तू खेळाडूच होतास ना? वसीम भाईने तुझे कान टोचले तरीही...