Join us  

रिषभ पंतला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संधी मिळेल, पण...! Jay Shah यांची एक अट

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या कार अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 11:48 AM

Open in App

T20 World Cup 2024  ( Marathi News ): क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी रिषभ पंत ( Rishabh Pant) सज्ज झाला आहे. रस्ता अपघातानंतर रिषभ क्रिकेटपासून दूर होता आणि तो आगामी इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधून दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात पुनरागमन करणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि दिल्ली कॅपिटल्सचे मेंटॉर रिकी पाँटिंग यांनीही त्याच्या पुनरागमनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण, तो आयपीएल २०२४ मध्ये यष्टिरक्षक-फलंदाज अशा दुहेरी भूमिकेत दिसण्याची शक्यता कमी आहे. रिषभचे पुनरागमन होत असताना जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून तो टीम इंडियाकडून पुनरागमन करेल, अशा शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खूप मोठे अपडेट्स दिले आहेत. 

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या कार अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला होता. या अपघातामुळे पंतच्या उजव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती व मनगट फ्रॅक्चर झाले होते आणि घोट्याच्या अस्थिबंधन पुनर्रचना शस्त्रक्रिया आवश्यक होती. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी आधीच सांगितले होते की, पंत आयपीएल खेळणार आहे. गेल्या महिन्यात कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी सांगितले की, पंतने विकेटकीपिंग सुरू केली आहे. आयपीएलसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल.  

जर तो यष्टिरक्षक-फलंदाज अशा दुहेरी भूमिकेत खेळेल, तर त्याचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून पुनरागमन होईल, असे वक्तव्य जय शाह यांनी केले आहे. "तो चांगली फलंदाजी करत आहे, तो बरा आहे. आम्ही लवकरच त्याला तंदुरुस्त घोषित करू," असे शाह यांनी पीटीआयला सांगितले. "जर तो आमच्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकला, तर ती आमच्यासाठी मोठी गोष्ट असेल. तो आमच्यासाठी मोठी संपत्ती आहे. जर तो यष्टिरक्षण करू शकला तर तो वर्ल्ड कप खेळू शकतो. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी कशी होते ते पाहूया." 

मोहम्मद शमी या वर्षाच्या अखेरीस पुनरागमन करेल... घोट्याच्या शस्त्रक्रियेतून बरा झालेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत पुनरागमन करेल, असे जय शाह म्हणाले. शमीच्या उजव्या अकिलीस टेंडनवर फेब्रुवारीमध्ये लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. शाह यांच्या वक्तव्यावरून तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नाही हे निश्चित झाले आहे. 

शमी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकला आहे आणि तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. सप्टेंबरमध्ये भारत बांगलादेश यांच्यात दोन कसोटी आणि तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. "शमीवर शस्त्रक्रिया झाली आहे; तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे,''असे शाह म्हणाले. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024जय शाहरिषभ पंतमोहम्मद शामीआयपीएल २०२४