Mohammad Shami, Bengal Cricket: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. शमी सध्या पूर्णपणे फिट होण्यासाठी मेहनत घेत आहे. फावल्या वेळेत सध्या तो अनेक इव्हेंट्स आणि अवॉर्ड शोमध्येही सहभागी होत आहे. नुकताच बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) ने कोलकाता येथे एक कार्यक्रम केला. या कार्यक्रमात शमीचा सन्मान करण्यात आला होता. हा कार्यक्रम शमीच्या सन्मानार्थ होता, पण त्याच्या नावाबाबत चूक झाली.
शनिवारी १४ सप्टेंबरला कोलकाता येथे बंगाल क्रिकेटच्या कार्यक्रमात शमीचा गौरव करण्यात आला. गेल्या वर्षीच्या विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून शमीला गौरविण्यात आले. भारतात झालेल्या विश्वचषकात शमीने अवघ्या ७ सामन्यात विक्रमी २४ विकेट घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत तो सर्वाधिक ठरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे CAB ने हा सत्कार सोहळा विश्वचषक स्पर्धेच्या जवळपास १० महिन्यांनंतर आयोजित केला. त्यातही मोठी चूक झाल्याने CAB टीकेचे धनी ठरले. दोन चुकांपैकी एक चूक नंतर बदलण्यात आली.
शमीचे नावच चुकवले..
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी मंचावर बोलावून शमीचा सत्कार केला. त्याला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा गौरव केला. हे सर्व घडत असतानाच स्टेजवर लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर शमीचे नाव आणि इतर माहिती दाखवण्यात आली. त्यात शमीच्या नावाचे स्पेलिंगच चुकीचे होते. त्याचे नाव 'मोहम्मद शमित' असे लिहिण्यात आले होते. ही चूक नंतर बदलण्यात आली.
एक नव्हे तर दोन चुका
आता या चुकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे CABची खूपच नाचक्की झाली. ही एकच चूक नव्हती. तर शमीच्या चुकीच्या नावाच्या खाली विश्वचषकाचे वर्षही चुकीचे लिहिले गेले होते. त्याची ती कामगिरी विश्वचषक २०२३ मधील होती, पण स्क्रीनवर २०२४चा विश्वचषक लिहिला होता.
Web Title: Mohammed Shami name wrong spelling mistake odi world cup year wrong cab bengal cricket award event viral photo
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.