मेहनत करायची तयारी असेल, तर तुम्ही कोणतंही स्वप्न पूर्ण करू शकता. भारतीय संघातील एका क्रिकेटपटूची गोष्ट अशीच संघर्षमय आहे. शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला हा क्रिकेटपटू कब्रस्तानमध्ये गोलंदाजीचा सराव करायचा आणि आता तो जगातील सर्वात घातकी गोलंदाज आहे. या खेळाडूनं स्वतःच्या हिमतीवर भारतीय संघातील आपले स्थान अढळ बनवले आहे. लहानपणापासूनच त्याच्या वाट्याला संघर्ष आला आणि आताही वैयक्तिय आयुष्यातील अडचणींवर मात करून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा गाजवत आहे.
मोहम्मद शमी असे या गोलंदाजाचे नाव आहे. उत्तर प्रदेशमधील अमरोह येथील सहसपुर अलीनगर गावातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील त्याचा जन्म. शमीला लहापणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि त्याला गोलंदाजी करायला आवडायची. त्यामुळे जिथे संधी मिळेल, तिथे तो गोलंदाजीच्या सरावाला लागायचा. शमीच्या घराच्या मागे कब्रस्तान होतं आणि तेथेच त्यानं गोलंदाजीचा सराव केला.
प्रशिक्षक बदर अहमद यांनी त्याला चांगली साथ दिली. त्यांनी शमीच्या गोलंदाजीला एक दिशा दाखवली. शमी ताशी 140 किमीच्या वेगानं गोलंदाजी करायचा. स्थानिक स्पर्धांमध्ये त्याच्यासमोर टिकणे जवळपास अशक्यच होते. त्यानं उत्तर प्रदेश संघाकडून ट्रायल दिली, परंतु त्याची निवड झाली नाही. त्यानंतर बदर अहमद यांनी त्याला कोलकाताच्या क्रिकेट क्लबमधून खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यानं कोलकाता येथे सरावाला सुरुवात केली आणि तिथून त्याचं नशीब पालटलं.
कोलकाताच्या इडन गार्डनवर सौरव गांगुली सरावासाठी आला होता आणि त्यानं शमीला गोलंदाजी करण्याची संधी दिली. शमीनं त्याच्या जलद माऱ्यानं गांगुलीला सतावलं त्यानंतर गांगुलीनं बंगाल क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाला शमीच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. 2013मध्ये शमी भारतीय संघाचा सदस्य बनला. शमीनं 49 कसोटी सामन्यांत 180 विकेट्स घेतल्या आहेत. 77 वन डे सामन्यात त्याच्या नावावर 144 विकेट्स आहेत.