भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्यापासून म्हणजेच १७ डिसेंबरपासून तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहे. त्यामुळे आता एकदिवसीय मालिका जिंकण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, एकदिवसीय मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारताला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून भारताचे दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर पडले आहेत. एकदिवसीय मालिकेतून दीपक चहरने माघार घेतली आहे. तर मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. हे दोघेही वेगवान गोलंदाज आहेत.
बीसीसीआयने एक निवेदन जारी करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी केली होती. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला होता. यानंतर तो जखमी झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकणार नाही. तर दुसरीकडे, दीपक चहरने कौटुंबिक कारणामुळे या दौऱ्यातून आपले नाव मागे घेतले आहे.
भारतात-ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी दीपक चहरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. चौथ्या सामन्यातही तो खेळला पण पाचव्या सामन्यात मायदेशी परतला. त्यावेळी वडिलांची तब्येत बरी नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याच कारणामुळे दीपक चहर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही गेला नाही. आधी तो टी-20 मालिकेतून बाहेर झाला आणि आता तो एकदिवसीय मालिकेतही खेळू शकणार नाही.
दरम्यान, मेडिकल इमर्जन्सीमुळे दीपक चहरने वनडे मालिकेमधून माघार घेतली असल्याचे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तर मोहम्मद शमीबाबत बीसीसीआयने सांगितले की, मोहम्मद शमीचे कसोटी मालिकेत खेळणे त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून आहे. तो बीसीसीआयच्या मेडिकल टेस्टमध्ये अपयशी ठरला. त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
'या' खेळाडूला मिळाली संधी
दीपक चहरने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्यानंतर निवड समितीने त्याच्या जागी आकाश दीपला संघात स्थान दिले आहे. बंगालचा आकाश आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. मात्र, बीसीसीआयने शमीच्या बदलीबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. याशिवाय राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांबरे हे वनडे मालिकेत संघासोबत नसतील, असे बीसीसीआयने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. त्यांच्या जागी सितांशु कोटक (फलंदाजी प्रशिक्षक), राजीव दत्त (गोलंदाजी प्रशिक्षक), अजय रात्रा (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) एकदिवसीय मालिकेत संघासोबत असतील.
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय सामना - १७ डिसेंबर; दुपारी १.३० वाजता
दुसरा एकदिवसीय सामना - १९ डिसेंबर; दुपारी ४.३० वाजता
तिसरी एकदिवसीय सामना- २१ डिसेंबर; दुपारी ४.३० वाजता
Web Title: Mohammed Shami ruled out of South Africa Tests, Deepak Chahar withdraws from ODI series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.