वन डे विश्वचषक जिंकून बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताच्या तोंडचा घास पळवला, असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारताने उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य सामन्यात देखील बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव करून यजमान संघाने ट्रॉफीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. पण, अंतिम सामन्यात नेमका भारताला पराभव पत्करावा लागला अन् तमाम भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. हा पराभव चाहत्यांसह खेळाडूंच्याही जिव्हारी लागला. सामना संपताच भारतीय कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर झाले. याचबद्दल बोलताना भारताकडून विश्वचषक गाजवणाऱ्या मोहम्मद शमीने एक मोठे विधान केले आहे.
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना शमीने सांगितले की, विश्वचषकात हरल्याने संपूर्ण देश निराश झाला. आम्ही ज्या पद्धतीने सुरूवातीपासून खेळत होतो, तो वेग शेवटपर्यंत कायम ठेवण्याचा आणि अंतिम सामना जिंकण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत होतो. पण, शेवटी आमची नेमकी कुठे चूक झाली हे सांगता येणार नाही. तो खूप भावनिक क्षण होता, असे शमीने विश्वचषकातील पराभवावर सांगितले.
भारताचा विजय रोखत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. अंतिम सामन्यात नाणेफेकिचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.