धर्मशाला : भारतीय संघाने बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करून तब्बल २० वर्षांचा आयसीसी इव्हेंटमधील विजयाचा दुष्काळ संपवला. विराट कोहलीने ९५ धावांची महत्त्वाची खेळी करून टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण त्या आधी मोहम्मद शमीने मिळालेल्या संधीचे सोने करताना पाच बळी पटकावले. शार्दुल ठाकूरच्या जागी शमीला न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात संधी मिळाली. खरं तर २००३ पासून कोणत्याच आयसीसी इव्हेंटमध्ये भारताला न्यूझीलंडविरूद्ध विजय मिळवता आला नव्हता. हा लाजिरवाणा विक्रम रोहितसेनेने मोडीत काढला अन् विजयाचा 'पंच' लगावला. या विजयासह भारतीय संघ दहा गुणांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला.
मोहम्मद शमी आणि विराट कोहली हे दोघे भारताच्या विजयाचे हिरो ठरले. शमीने गोलंदाजीत तर किंग कोहलीने फलंदाजीत कमाल केली. कठीण वाटणाऱ्या खेळपट्टीवर 'विराट' खेळी करून कोहलीने पुन्हा एकदा चेसमास्टर असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यांमध्ये बाकावर बसलेल्या शमीने सामन्यानंतर एक मोठे विधान केले. तुम्ही दुसऱ्याच्या यशाचा आनंद घेतला तर तुम्हाला देखील चांगले रिझल्ट्स मिळतात, असे त्याने म्हटले.
शमीचं मनात घर करणार विधान रवींद्र जडेजाने विजयी चौकार मारून भारताची विजया'दशमी' साजरी केली. कारण न्यूझीलंडविरूद्धच्या विजयामुळे भारताचे दहा गुण झाले असून आता उपांत्य फेरीतील यजमानांची जागा जवळपास निश्चित झाली आहे. सामन्यानंतर बोलताना मोहम्मद शमीने विविध बाबींवर प्रकाश टाकला. "तुम्ही दुसऱ्याच्या यशाचा आनंद घेतला तर याचा फायदा तुम्हालाच होतो. मी बाकावर बसलेलो असताना सर्वकाही पाहत होतो. भारतीय संघ चांगली कामगिरी करत होता. पण, मला संधी मिळत नव्हती म्हणून मला कधीच वाईट वाटले नाही. प्रत्येकाने एकमेकांच्या यशाचा पुरेपुर आनंद घ्यायला हवा", असे शमीने म्हटले.
भारताचा विजयी 'पंच'२० वर्षांचा दुष्काळ संपवून भारताने अखेर न्यूझीलंडला पराभूत करण्यात यश मिळवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताने चांगली सुरूवात केली. पण, डॅरिल मिशेल (१३०) आणि रचिन रवींद्र (७५) यांनी यजमानांची डोकेदुखी वाढवली. अखेर निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा करून किवींनी भारतासमोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीरांनी स्फोटक सुरूवात केली. रोहित शर्मा (४६) आणि शुबमन गिल (२६) धावा करून तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. त्याला श्रेयस अय्यरने (३३) चांगली साथ दिली. मात्र, अय्यर बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा नाबाद ३९ धावांची खेळी करून अखेरपर्यंत टिकून राहिला. सामन्याचा हिरो विराट कोहली मात्र त्याच्या शतकाला मुकला आणि (९५) धावांवर बाद झाला अन् 'विराट' खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी आणि १२ चेंडू राखून विजय साकारला.