बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. जलगदती गोलंदाज मोहम्मद शमी एकदम तंदुरुस्त झाला असून तो जवळपास वर्षभरानंतर मैदानात उतरण्यात तयार आहे. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत तो शेवटचा सामना खेळला होता. दुखापतीमुळे त्याला टीम इंडियाकडून सोडा देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानापासूनही दूर राहावे लागले. आता रणजी करंडक स्पर्धेतून तो कमबॅक करणार आहे.
शमी कमबॅकसाठी सज्ज; कधी उतरणार मैदानात?
रणजी करंडक स्पर्धेतील एलीट ग्रुप सीमध्ये पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामना १३ नोव्हेंबरला रंगणार आहे. या सामन्यासाठी पश्चिम बंगालच्या संघात शमीच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशननं एका निवेदनाच्या माध्यमातून शमीचा संघात समावेश करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारतीय क्रिकेटसह बंगालसाठी एक चांगली बातमी आहे. मोहम्मद शमी रणजी सामन्यातून कमबॅकसाठी सज्ज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बुधवारी इंदुरच्या मैदानात रंगणाऱ्या मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात शमी संघाचा भाग आहे. बंगालच्या जलदगती गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
शमीच्या कामगिरीवर असतील सर्वांच्या नजरा
मोहम्मद शमीला बंगालच्या संघात स्थान मिळाल्यामुळे टीम इंडियासाठी फायद्याचे ठरेल. तो फिटनेस सिद्ध करून पुन्हा टीम इंडियात परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरकीडे बंगालचा संघ रणजी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत आपलं स्थान पक्क करण्यासाठी उत्सुक आहे. बंगाल संघाने पहिल्या चार सामन्यानंतर ८ गुण कमावले आहेत. मोहम्मद शमी संघात आल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. शमी कशी कामगिरी करतोय त्यावर सर्वांच्या नजरा असतील.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही केला जाऊ शकतो विचार
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी शमीची टीम इंडियात वर्णी लागलेली नाही. पण जर शमीनं रणजी स्पर्धेत धमाक्यात पदार्पण केले आणि सातत्यपूर्ण मोठे स्पेल टाकून फिटनेस सिद्ध केला तर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील अखेरच्या तीन कसोटी सामन्यासाठी बोलावणं येऊ शकते.