कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या आयुष्यात गेल्या दोन आठवड्यांपासून चांगले काही घडत नव्हते. पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांनंतर शामी निराश झाला होता. पण ही निराशा आता त्याने झटकली आहे. 'हसीन' वादळातून स्वतःला सावरत मोहम्मद शामी मैदानात उतरला आहे.
हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती. बीसीसीआयने शामीला आपल्या कारारातून वगळले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीची चौकशी केली होती. पण बीसीसीआयने मात्र त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.
यंदा आयपीएलच्या मोसमाची 7 एप्रिलला सुरुवात होणार आहे. शामी हा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी शामी प्रयत्नशील असून त्याने सराव करायला सुरुवात केली आहे.
हसीनने हे सारे आरोप केल्यावर बीसीसीआयने आपल्या करारामधून शामीला वगळले होते. त्याचबरोबर बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधविरोधी पथकाने तब्बल तीन तास शामीची कसून चौकशी केली होती.