भारताच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अविश्वसनीय कामगिरीचा नायक मोहम्मद शमी ( Mohammed Shami) आणखी काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. कदाचित तो इंडियन प्रीमिअर लीग २०२४ लाही मुकण्याची शक्यता आहे. शमी संपूर्ण वर्ल्ड कप दुखापतग्रस्त असूनही इंजेक्शन घेऊन खेळला होता आणि त्याने ७ सामन्यांत २४ विकेट्स घेत प्रतिस्पर्धींना धक्क्यांमागून धक्के दिले होते. तो स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता, परंतु वर्ल्ड कपनंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. सोमवारी त्याच्या टाचांवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
शमीने इंस्टाग्रामवर लिहिले की, "माझ्या achilles tendon टाचवर नुकतेच यशस्वी ऑपरेशन झाले आहे! ते बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यासाठी उत्सुक आहे."
IPL 2022 मेगा-लिलावात ६.२५ कोटी रुपयांमध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील झालेल्या शमीने २०२२ मध्ये २० विकेट घेतल्या. त्याने आयपीएल २०२३ मध्ये १७ सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएल २०२४ मिनी-लिलावात गुजरातने उमेश यादवला आपल्या ताफ्यात घेतले होते आणि शमीच्या अनुपस्थितीत त्याच्यावर जबाबदारी असणार आहे.