शारजा : भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर धार्मिक टीकेचे लक्ष्य ठरलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला पाठिंबा देत पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान याने शमी हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक असून त्याचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध शमीने ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या होत्या. भारताने हा सामना दहा गड्यांनी सहज गमावला.
शमीला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांनी त्याचा धर्म काढला. या सामन्यात नाबाद ७९ धावा ठोकणारा रिझवान याने मंगळवारी खेळाडूंप्रति सन्मान बाळगण्याचे चाहत्यांना आवाहन केले. तो म्हणाला, ‘खेळाडूवर नेहमीच शानदार कामगिरीचे दडपण असते. खेळाडूला देशासाठी आणि चाहत्यांसाठी नेहमी दडपणात राहून संघर्ष करावा लागतो शिवाय बलिदान द्यावे लागते. चाहत्यांच्या या धर्मांध टीकेनंतर अनेक आजी-माजी खेळाडू, राजकीय नेते आणि सुजाण नागरिकांनी मात्र सोशल मीडियावर शमीला पाठिंबा दिला.
कोहलीने पराभव स्वीकारल्याचे कौतुक : सना मीर
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीर हिने भारताचा कर्णधार विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले. संपूर्ण खेळभावनेने पराभव स्वीकारणारा विराट कोहली आदर्श खेळाडू असल्याचे सनाने म्हटले आहे. पाकिस्तानविरोधातील मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीने मोहम्मद रिझवानची गळाभेट घेतली होती. बाबर आझमचेही अभिनंदन केले होते.
टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मोठा पराभव केला. यासोबत भारताविरोधात विजयी न होण्याचा लाजिरवाणा विक्रमही पाकिस्तानने मोडीत काढला. सना मीरने आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, ‘विराट कोहलीने पूर्ण खेळभावनेने पराभव स्वीकारला आणि त्याच्या याच गोष्टीचे मी कौतुक करते. मोठ्या खेळाडूंनी अशा पद्धतीने वर्तन करणे खरेतर चांगले लक्षण आहे.’ विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही विराट कोहलीचा फोटो शेअर करत खेळभावनेचे कौतुक केले.
सना मीरने पुढे म्हटले की, ‘यामुळे त्यांच्यात असणाऱ्या सुरक्षा भावनेचीही जाणीव होते. याचा अर्थ पुनरागमन करण्यासंबंधी त्यांना विश्वास आहे”. भारताने एखादा मोठा विजय मिळवत पुनरामन केले तर आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. ‘भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अंतिम सामन्यात मैदानात खेळताना दिसतील,’ अशी मला आशा आहे.
Web Title: Mohammed Shami veteran bowler, honor him; Pakistan wicketkeeper Rizwan's appeal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.