नवी दिल्ली-
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन जबरदस्त कामगिरीची नोंद केली. भारतीय संघाच्या यशात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची देखील महत्वाची भूमिका राहिली आहे. नागपूर कसोटीत शमीनं ज्या पद्धतीनं ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला क्लिनबोल्ड केलं तो क्षण कधीच विसरता येणारा नाही.
आता मोहम्मद शमीच्या बाबतीत भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मोठा दावा केला आहे. मोहम्मद शमी २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्याआधी फिटनेस टेस्ट पास करण्यात अयशस्वी ठरला होता. त्यावेळी शमीनं निवृत्ती जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्यावेळी आपल्याला कळलं की शमी चांगल्या मूडमध्ये नाही तेव्हा आपण तात्काळ त्याला हेड कोच रवी शास्त्री यांच्याकडे घेऊन गेलो होतो, असं भरत अरुण यांनी सांगितलं.
यो-यो चाचणीत शमी फेल"२०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्याआधी फिटनेस टेस्ट होती आणि शमी या टेस्टमध्ये पास होऊ शकला नव्हता. भारतीय संघातील जागा त्यानं गमावली होती. त्यानं मला फोन केला आणि मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी लगेच शमीला माझ्या खोलीत बोलावलं. शमी त्यावेळी खूप निराश होता. फिटनेसच्या अडचणीमुळे तो खूप गोंधळला होता आणि मानसिकरित्या निराश देखील होता. शमी माझ्याकडे आला तेव्हा आपण खूप वैतागलेलो असून क्रिकेट सोडण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं", असं भरत अरुण यांनी क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
"मी तातडीनं शमीला हेड कोच शास्त्री यांच्याकडे घेऊन गेलो. शमीनं शास्त्री यांनाही सांगितलं की त्याला क्रिकेट सोडावंस वाटत आहे. तेव्हा आम्हीच त्याला प्रतिप्रश्न केला की क्रिकेट खेळायचं नाही मग तुला काय करायचं आहे? आणखी दुसरं काय करण्याचा विचार आहे?", असं भरत अरुण म्हणाले.
रवी शास्त्रींनी वाढवला आत्मविश्वासभरत अरुण पुढे म्हणाले की, "रवी शास्त्रींनी शमीला सांगितलं की चांगली गोष्ट आहे की तुला राग आला आहे. जे काही घडलं आहे ते चांगलं आहे कारण तुझ्या हातात आज चेंडू आहे. फक्त तुझा फिटनेस खराब आहे. तुझा राग तू फिटनेसच्या बाबतीत काढ, आम्ही तुला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवत आहोत आणि आमची इच्छा आहे की तू तिथं ४ आठवडे राहावंस. तू आता घरी जाणार नाहीस, तू थेट एनसीएमध्ये जाशील असं शास्त्रींनी शमीला सांगितलं. शमीनं मग पाच आठवडे एनसीएमध्ये काढले"
मोहम्मद शमीनं मग जबरदस्त कमबॅक केलं आणि इंग्लंड विरुद्धचे सर्व पाच सामने खेळले. तसंच १६ विकेट्स देखील घेतल्या. शमीनं काही महिन्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी ऐतिहासिक कसोटी विजयात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.