नवी दिल्ली : भारताचा सर्वांत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद येथे ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत अंतिम एकादशमध्ये खेळू शकेल. कार्यभार व्यवस्थापनाअंतर्गत शमीला इंदूर कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. बीसीसीआयने वैद्यकीय पथकाच्या शिफारशीनुसार आयपीएलचे अधिक सामने खेळणारे आणि वन-डे विश्वचषकाच्या योजनेत सहभागी वेगवान गोलंदाजांसाठी कार्यभार व्यवस्थापनाची योजना आखली आहे. शमी सुरुवातीला दोन्ही कसोटी सामने खेळला. तो एकदिवसीय मालिकेतही खेळणार आहे. इंदूर कसोटीत त्याच्याऐवजी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले होते.
मोहम्मद सिराजने तिन्ही कसोटी सामन्यात केवळ २४ षटके गोलंदाजी केली. १७ ते २२ मार्च या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या तीन वन-डेमध्ये त्याला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळू शकते. अशावेळी सिराजला अखेरच्या कसोटीत विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
शमीने या मालिकेत दमदार मारा करीत ३० षटकांत सात गडी बाद केले. मोटेराच्या शुष्क खेळपट्टीवर संघाला त्याची अधिक गरज भासेल. अशी खेळपट्टी रिव्हर्स स्विंगसाठी अनुकूल असू शकते. भारत सध्या चार सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पुढे आहे. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक देण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे असेल.
इंदूरच्या खेळपट्टीला आयसीसीने खराब रेटिंग दिल्यामुळे अहमदाबादची खेळपट्टी बनविताना गुजरात क्रिकेट संघटना कुठलीही अतिरिक्त जोखीम पत्करण्याच्या स्थितीत नाही. जीसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवस दोन्ही संघांना सारखा लाभ मिळेल अशी खेळपट्टी बनविण्याची सूचना क्युरेटरला देण्यात आली आहे.