(Marathi News) : Maldives vs Lakshadweep असा वाद सध्या सुरू आहे.. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपमधील फोटो पोस्ट केले. त्यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांनी मोदींवर टीका केली. मालदीव सरकारने सावरासावर करून माफी मागितली खरी, परंतु त्यांच्या पर्यटनाला मोठा धक्का बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर बॉलिवूड सेलिब्रेटी व सचिन तेंडुलकर पासून ते सुरेश रैना या क्रिकेटपटूंनीही टीका केली. आता भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) यानेही त्याचे मत मांडले आहे.
मोहम्मद शमीने भारतीय पर्यटनासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे आणि भारतीय नागरिकांना देशातील समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. "आपण आपल्या पर्यटनाला चालना दिली पाहिजे. देश कोणत्याही मार्गाने पुढे जात असला तरी ते सर्वांसाठी चांगले आहे. आपला देश पुढे जाण्यासाठी पंतप्रधान प्रयत्नशील आहेत त्यामुळे आपणही त्याला पाठिंबा दिला पाहिजे," असे शमीने एएनआयला सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ ऐतिहासिक केप टाऊन कसोटी जिंकून भारतात आला आहे आणि २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी हैदराबाद येथे होईल, तर शेवटची कसोटी ११ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवली जाईल. मोहम्मद शमीला आफ्रिका दौऱ्यावर दुखापतीमुळे जाता आला नव्हते आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींत त्याचे खेळणे अनिश्चित आहे. पण, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तो सज्ज आहे.
"मी या दौऱ्यासाठी नवीन काही करण्याचा विचार करत नाही. मला नेहमी वाटायचे की, मी तंदुरुस्त राहिलो तर सामन्यात माझी कामगिरी अप्रतिम होईल. माझ्यावर दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करतो. प्लस पॉइंट म्हणजे ही मालिका आमच्या घरच्या मैदानावर आहे. तुम्ही चांगली मानसिकता आणि फिटनेस घेऊन मैदानावर पोहोचणे खूप महत्वाचे आहे. पूर्वी लोकांना भारत हा फलंदाजीत वर्चस्व गाजवणारा संघ आहे असे वाटायचे. पण, भारत हा गोलंदाजांचा संघ आहे हे लोकांना मागील कळले आहे,” तो पुढे म्हणाला.