मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल बीसीसीआयनेही घेतली होती. बीसीसीआयने शामीला आपल्या करारातूनही वगळले होते. पण आता भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआयने शामीला क्लीन चीट दिली आहे. त्याचबरोबर त्यावर करण्यात आलेले मॅच फिक्सिंगचे आरोपही फेटाळले आहेत. त्यामुळे आता शामीचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हसीनने शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. पण आता तर हसीनने शामीवर मॅच फिक्सिंग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती. बीसीसीआयने शामीला आपल्या कारारातून वगळले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीची चौकशी केली होती.
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीची तीन तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल बीसीसीआयला सादर केला होता. या अहवालावर बीसीसीआय शुक्रवारी आपला निर्णय जाहीर करणार आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, " भ्रष्टाचार विरोधी पथकाने आपला अहवाल बीसीसीआयसा सादर केला आहे. या अहवालामध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकाने शामीवरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याला क्लीन चीट दिली आहे."
बीसीसीआयने क्लीन चीट देताना त्याच्यावरील मॅच फिक्सिंगचे आरोप फेटाळले आहेत. त्याचबरोबर बीसीसीआय शामीला आता आपल्या करारामध्ये सामील करून घेणार आहे. करारामध्ये शामीला ' ब ' श्रेणी देण्यात येणार आहे.