भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे यंदाच्या प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस निवड समितीने केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) क्रीडा मंत्रालयाकडे त्यासाठी विशेष विनंती केली आहे. शमीचे नाव सध्याच्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत नाही. अर्जुन पुरस्कार हा भारताचा दुसरा प्रतिष्ठीत पुरस्कार आहे. त्याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ७ सामन्यांत सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या होत्या. हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर शमीची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आणि वानखेडेवर श्रीलंकेविरुद्ध त्याने १८ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात १८ धावा देताना २ महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. न्यूझीलंडविरुद्धही त्याने उल्लेखनीय गोलंदाजी केली.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पन्नास विकेट्सचा टप्पा ओलांडणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. लसिथ मलिंगा ( ५६), मिचेल स्टार्क ( ६५), मुरली मुरलीधरन ( ६८) आणि ग्लेन मॅक्सवेल ( ७१) यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत शमीपेक्षा ( ५५) जास्त विकेट्स घेतल्या आहेत. पण, या सर्वांपेक्षा शमी वर्ल्ड कपचे कमी सामने खेळलेला आहे. शमी सध्या दुखापतीतून सावरत आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.