सेन्च्युरियन : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने काल दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. पहिल्या डावात पाच बळी घेण्यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा पार केला. शमीने ५५ व्या कसोटीत ही कामगिरी केली. अभेद्द खडकासारखा भक्कम राहून त्याने लक्ष्य साध्य केले आहे.
पत्नीसोबतच्या नात्यात आलेला विभक्तपणा, काही वर्षांआधी वडिलांचे निधन, टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर धर्माच्या नावावर त्याच्यावर ठेवण्यात आलेला राष्ट्रद्रोही हा ठपका इतकी सर्व संकटे आली; पण शमी डगमगला नाही. संयम गमावला नाही. द. आफ्रिकेविरुद्ध केलेल्या या कामगिरीचे श्रेय शमीने वडिलांना दिले. त्यांनीच शमीला दररोज ३० किमी सायकलिंग करण्याचा सल्ला दिला होता.
मंगळवारचा खेळ संपल्यानंतर आपल्या यशाचे श्रेय त्याने अब्चू तौसिफ अली यांना दिले. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात साहसपूर गावात वास्तव्य करणारे तौसिफ अली यांच्या पाच मुलांपैकी मोहम्मद शमी एक. शमी १५ वर्षांचा असताना तौसिफ त्याला कोच बद्रूद्दीन यांच्याकडे घेऊन गेले. शमी रोज सायकलने कोचकडे जात वेगवान गोलंदाजीचे धडे घ्यायचा. आज तो भारतीय संघाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ बनला. धर्माच्या नावावर टीका करणाऱ्यांच्या, खोट्या गोष्टींचा माध्यमांवर प्रसार करणाऱ्यांच्या थोबाडात मारणारी कामगिरी शमीने केली. त्याच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसाठी शमीची वाटचाल सणसणीत चपराक ठरावी अशीच आहे.
शास्त्री, रोहित यांच्याकडून कौतुक...द. आफ्रिकेच्या पहिल्या डावात ३१ वर्षांच्या शमीने एडेन मार्कराम, किगन पीटरसन, तेम्बा बावुमा, वियान मुल्डर आणि कॅगिसो रबाडा यांना बाद केले. कसोटीत २०० गडी बाद करणारा शमी पाचवा भारतीय गोलंदाज बनला. या कामगिरीसाठी त्याच्यावर समाजमाध्यमांमध्ये स्तुतिसुमने उधळली जात आहेत. भारताचे माजी कोच रवी शास्त्री आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी शमीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शास्त्री यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर शमीला टॅग करीत लिहिले, ‘शाब्बाश! सुल्तान ऑफ बंगाल! पाहून मजा आली. बिर्याणी दोन दिवसांनंतर! हे मेहनतीचे फळ ईश्वर तुला आनंदी ठेवो.’ रोहितने ट्वीट केले, ‘दुहेरी शतक हा विशेष आकडा असतो.’
२०० वर थांबू नकोस - आर. पी. सिंगकसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पाही पूर्ण करणाऱ्या मोहम्मद शमीचे भारताचा माजी गोलंदाज आर. पी. सिंगने अभिनंदन केले आहे. तो आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, शमीने आता केवळ २०० बळींवर न थांबता भारतासाठी ३०० किंवा ४०० बळींचा टप्पा पूर्ण करावा. कारण सध्याच्या घडीला तो जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.