भारतीय संघाला गुरुवारी मोठा धक्का बसला... संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. वृत्तसंस्था PTI ने हे वृत्त प्रसिद्ध केले आणि भारतीय चाहते प्रचंड निराश झाले आहेत. आशिया चषक २०२२ स्पर्धेनंतर बुमराह ट्वेंटी-२०तही खेळणार नसल्याने टीम इंडियासमोर हे मोठे संकट आल्याची चर्चा आहे. मोहम्मद शमी किंवा दीपक चहर या दोघांपैकी एक जसप्रीत बुमराहला रिप्लेस करेल अशी चर्चा असताना तिसरे नाव समोर आले आहे.
ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास मैदानावर उतरला. आशिया चषक २०२२ स्पर्धेला मुकल्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढले आणि तो बंगळुरू येथील NCA येथे दाखल झाला. आता हाती आलेल्या बातमीनुसार त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे, त्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही, परंतु ४-६ महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
२०१९मध्ये बुमराहला दुखापत झाली होती. २०२२मध्ये जसप्रीत सर्वाधिक २५ ट्वेंटी-२० सामन्यांना मुकला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने मुकणाऱ्या खेळाडूंत जसप्रीत अव्वल स्थानी आहे. आर अश्विन २४, लोकेश राहुल २१ सामन्यांना मुकला आहे. सध्या सुरू असलेल्या आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून मोहम्मद शमीने आधीच माघार घेतली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याची राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली आहे. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याला माघार घ्यावी लागली. आफ्रिकेचा सामना करण्यासाठी तो तंदुरूस्त होईल अशी अपेक्षा होती, पण याही सामन्यातून त्याला मुकावे लागले.
जसप्रीतच्या माघार घेण्याने शमीची वर्ल्ड कपसाठीच्या मुख्य संघात वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे, त्यात राखीव गोलंदाज दीपक चहरने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२०त दमदार कामगिरी केले आहे. त्यामुळे त्याचेही नाव चर्चेत आहेच. सध्यातरी आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत जसप्रीतच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि सिराजने चांगली कामगिरी केल्या, तो वर्ल्ड कपही खेळू शकतो.