Join us  

IND vs AUS: मॅच सुरू असतानाच टीम इंडियाच्या मोहम्मद सिराजला बसला मोठा दणका!

सिराजने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या आजच्या सामन्यात घेतले दोन बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 7:25 PM

Open in App

Mohammad Siraj, IND vs AUS 3rd ODI: भारतीय संघ सध्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळत आहे. या सामन्यादरम्यानच टीम इंडिया आणि त्याच्या एका खेळाडूसाठी वाईट बातमी आली आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत या खेळाडूचे मोठे नुकसान झाले आहे. हा खेळाडू आहे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. सिराज एकदिवसीय क्रिकेटमधला नंबर-1 गोलंदाज होता, पण तिसर्‍या सामन्यादरम्यान, जेव्हा आयसीसीने एकदिवसीय गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली तेव्हा सिराजचे पहिले स्थान हिसकावले गेले. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूमुळेच सिराजला हा फटका सहन करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सिराजला वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरून हटवले आहे. आता हेझलवूड नंबर-1 गोलंदाज आहे आणि सिराज तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सिराजसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेजलवूड भारत दौऱ्यावर आलेला नाही, पण तरीही तो नंबर-1 च्या खुर्चीवर बसला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खराब कामगिरीमुळे सिराजला हे नुकसान सोसावे लागले आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये सिराजला विशेष काही करता आले नाही. मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सिराजने तीन विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत त्याने एकही विकेट घेतली नाही. चेन्नईतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिराजला दोन विकेट मिळाल्या. म्हणजेच या तीन सामन्यांत त्याने केवळ पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याशिवाय टॉप-10 मध्ये दुसरा कोणताही भारतीय गोलंदाज नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामोहम्मद सिराजआॅस्ट्रेलियाआयसीसी
Open in App