Mohammad Siraj, Team India: भारतीय संघाने २९ जून २०२४ला एक मोठा पराक्रम केला. भारताने तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्डकप वर आपले नाव कोरले. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या दिग्गज खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला हे यश मिळाले. या विजयानंतर भारतीय संघातील सर्वच खेळाडूंचे मायदेशात दणक्यात स्वागत झाले. तसेच अनेक खेळाडूंना आपापल्या राज्य सरकारांकडून विविध स्वरुपात बक्षीस मिळाले. याच दरम्यान आता मोहम्मद सिराज लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसू शकतो, अशी चर्चा आहे. खुद्द तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केलेल्या घोषणेमुळे ही चर्चा सुरु झाली आहे.
मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याला राज्य सरकार गुप-१ ची नोकरी देऊ शकते असे बोलले जात आहे. या प्रस्तावावर मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी बुधवारी विधानसभेत केली. सीएम ए रेवंत रेड्डी म्हणाले की, सिराजने फक्त इंटरमिजिएटपर्यंतच शिक्षण घेतले आहे, पण तो जागतिक पातळीवर उंची गाठण्यात सक्षम ठरला आहे. सिराज हैदराबादचा आहे. त्यामुळे गट-१ची नोकरी म्हणजे पोलिस दलात जाण्याचा निर्णय घेतल्यास सिराजला थेट डीएसपी (DSP) पदावर नियुक्ती मिळेल.
सिराज सध्या श्रीलंका दौऱ्यावर
मोहम्मद सिराज सध्या टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर आहे. नुकतीच त्याने तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली. आता तो वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजचे आकडे खूपच प्रभावी आहेत. त्याने या संघाविरुद्ध आतापर्यंत ६ एकदिवसीय सामने खेळले असून १९ बळी घेतले आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेटही केवळ ३.५ होता.