Mohammed Siraj: भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या कौंटी चॅम्पियशीपमध्ये वॉर्विकशायर क्लबकडून खेळतोय... भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा सदस्य नसल्याने सिराजने कौंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने सोमरसेटच्या फलंदाजांची दैना उडवली. या सामन्यात India vs Pakistan असाही मुकाबला पाहायला मिळाला आणि त्यात भारतीय गोलंदाज भारी पडला. सिराजने पहिली विकेट घेतली ती पाकिस्ताच्या इमाम-उल-हक याची... त्यानंतर त्याने विकेट्सचा धडाका कायम राखला. त्याच्या सोबतीला भारताचा आणखी एक फिरकीपटू जयंत यादव ( Jayant Yadav) हाही आला आणि त्यानेही १ विकेट घेत हातभार लावला.
आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांनी १-१ अशी बरोबरी साधली. आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट्स राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील पराभवाची परतफेड केली. पण, त्यानंतर सुपर ४ च्या लढतीत बाबर आजमचा संघ वरचढ ठरला. आता उभय संघ पुन्हा ऑक्टोबरमध्ये भिडणार आहेत. त्याआधी कौंटी चॅम्पियनशीपमध्ये सिराज व इमाम यांच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान सामना रंगला. सिराजच्या भेदक गोलंदाजीवर इमाम फार काळ टिकला नाही आणि ५ धावा करून माघारी परतला.
सिराजने धक्कातंत्र कायम राखताना सोमरसेटच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. सिराजने १९-५-५४-४ अशी कामगिरी केली. जयंतने ४२ धावांत १ विकेट घेतली. सोमरसेटचे ८ फलंदाज १८२ धावांत तंबूत परतले. लुईस ग्रेगोरीने नाबाद ६० धावा केल्या. त्याला जॉश डेव्ही ( २१) व साजिद खान ( ३१*) या तळाच्या फलंदाजांची साथ मिळाली.